‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा उपसमितीच्या निर्णयांवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 04T214729.923

Jarange makes serious allegations against Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा उपसमितीच्या निर्णयांवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या वयात त्यांनी स्वतःचं राजकारण पाहावं, पुतण्याला खासदार कसं करता येतं ते पाहावं. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.

राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्या मान्य केल्याचं सांगण्यात आलं असलं तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

दरम्यान, छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर जरांगे यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. तुम्ही मराठ्यांच्या लेकरांवर का जळता? ओबीसी महामंडळ खाऊन टाकलं, महाराष्ट्र सदन खाल्लं. आता ओबीसींनी यांना ओळखलं आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. भुजबळांच्या राजकीय भूमिकांवरही जरांगे यांनी टीका केली. वेळ पाहून हे महाविकास आघाडीचे कसे होतात, महायुतीमध्ये कसे जातात, कधी अजितदादांसोबत जातात, हे सगळे पाहत आहेत.

‘लहानपणापासून प्रश्न पडत होते, पुस्तकांनी स्पष्टता दिली’; विद्यानंद बापटांचा नास्तिकतेबाबत मोठा खुलासा

भुजबळांनी जे काही केलं ते आता ओबीसी समाज जाणतोय. त्यांची उतरती कळा लागली आहे. एखाद्यावर जळण्याची वृत्ती कुणाचीही नसावी, असं जरांगे म्हणाले. ओबीसींच्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भुजबळांना सवाल केला. “मराठा समाज एवढा मोठा असून फक्त 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ओबीसींची संख्या 60 टक्के आहे हे भुजबळांना कुणी सांगितलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या दोन दिवसांत भुजबळांना काय झालं? म्हातारपणात चांगली भूमिका घेतील असं वाटलं होतं, पण बळ गेलं तरी पीळ गेला नाही, असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला. भुजबळांना आता राजकीय पोळी भाजायची असून पुतण्याला खासदार करायचं असेल, असा आरोप करत आपण यांना आता महत्त्व देणं कमी करावं, असंही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या संघर्षात आता भुजबळ आणि जरांगे यांच्यातील शाब्दिक चकमक पुन्हा तीव्र झाली आहे. एकीकडे भुजबळ ओबीसी आरक्षण आणि मराठा उपसमितीच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे जरांगे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवरच जोरदार हल्ला चढवला आहे.

follow us