Karan Adani-Anant Ambani : करण गौतम अदानी, अनंत अनिल अंबानी देणार राज्याला आर्थिक सल्ला
मुंबई : दोन आठवड्यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी ग्रुप मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. बाजारात मोठी घसरण झाली असल्यामुळे अदानी ग्रुपला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अहवालामुळे अदानी ग्रुपवर अनेक प्रश्नही उभे केले जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र गौतम अदानी यांच्या पुत्राला राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून घेतलं आहे. तर याच परिषदेवर अनिल अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांची देखील सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
राज्य सरकारने काल एक अधिसूचना काढून जाहीर केलं आहे. आर्थिक आणि इतर संबंधित मुद्यांवर राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी एक स्वतंत्र संस्था म्हणून आर्थिक सल्लागार परिषद असल्याचे सरकारी ठरावात म्हटले आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राज्याची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. त्यानुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन बनण्याचे उद्दिष्ट हे राष्ट्रीय उद्दिष्टाशी निगडीत आहे आणि ते साध्य करण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांची मदत होईल, असे यात म्हटले आहे.
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. या सल्लागार परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्तीचा सरकारी आदेश सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. अध्यक्षांसह तीन सचिव हे पूर्णवेळ सदस्य आहेत. याशिवाय १७ सदस्यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
परिषदेवरील सदस्य
एन. चंद्रशेखरन अध्यक्ष, टाटा सन्स अध्यक्ष
सदस्य :
अजित रानडे, कुलगुरु, गोखले राजशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था
अमित चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक, बेन कॅपिटल
अनंत अंबानी , कार्यकारी संचालक, रिलायन्स
अनिश शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिद्रा आणि मिहद्रा
बी. के. गोयंका, अध्यक्ष , वेलस्पन
दिलीप संघवी, व्यवस्थापकीय संचालक, सन फार्मा
का कू नखाते, अध्यक्ष, बँक ऑफ अमेरिका
करण अदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी पोर्ट
मिलिंद कांबळे, अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री
प्रसन्ना देशपांडे , अध्यक्ष, चैतन्य बायोटेक.
संजीव मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, हिंदूस्थान युनिलिव्हर
एस. एन. सुब्रहमण्यम, व्यवस्थापकीय संचालक, लार्सन अॅन्ड टुबरे
श्रीकांत बडवे, मुख्य कार्यकारी अधिकारी , बडवे इंजिनियिरग
विक्रम लिमये, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय शेअर बाजार
विलास शिंदे, अध्यक्ष सह्याद्री फाम्र्स
विशाल महादेविया, व्यवस्थापकीय संचालक, वॉरबर्ग पिंकस
झिया मोदी, व्यवस्थापकीय भागीदार, एझेडबी
१३ तारखेला पहिली बैठक
नवनियुक्त राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक सोमवारी (१३ फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्याकरिता कोणते उपाय योजता येतील या दृष्टीने या परिषदेने राज्य सरकारला सल्ला द्यायचा आहे.