जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली
जालना : जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे.
दरम्यान यावर बोलताना खोतकर म्हणाले, जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे.
आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गोरंटयाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही केली आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये ज्या लोकांचे पैसे बुडाले आहे. त्या लोकांचे पैसे आमदारांनी द्यावे असंही ते म्हणाले. लोकांचे बुडालेले पैसे आणून द्या अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा देखील खोतकरांनी दिला.
आमदाराने हा विषय माझ्या परिवारापर्यत नेला असून मी एवढ्या खालच्या थराला कधी गेलो नाही. माझ्या जावयाचे आणि किरण खरात यांचे चांगले संबंध असून माझ्या जावयाने एवढ्या अडचणीच्या काळातही किरण खरातला पैशांची मदत केली. त्यांच्यातील व्यवहार देखील पारदर्शक झाला असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.
आमदार गोरंटयाल काय म्हणाले होते?
शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटातील काही जणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,त्यांच्यावर मोक्का लावा अशी मागणी काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंटयाल यांनी पत्रकार परिषदेत केली.