अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना, बायको नांदायला येईना; पतीने 4 मुलांसह विहिरीत जीवन संपवले

Korhale Village News : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) राहता (Rahta) तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. राहता तालुक्यातील कोऱ्हाळे (Korhale) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 30 वर्षीय अरुण काळे (Arun Kale) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवानी अरुण काळे (वय 8 ), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी मयत मुलांची नावे आहेत.
माहितीनुसार, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात अरुण काळे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. आठ दिवसांपूर्वी घरातील वादामुळे त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना पत्नीच्या माहेरी घेऊन जात असताना अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवरात विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आतापर्यंत विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून दोघांचा शोध सुरु आहे. विहिरी 45 फूट खोल असून दिवसभरापासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या आवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे अरुण काळे याने मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वत:चे हात पाय बांधून विहिरीत उडी घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टी अन् वादळी वारे; अलर्ट जारी
तर दुसरीकडे मृतांपैकी दोन मुलं अहिल्यानगरमधील आश्रमशाळेत शिकत होती. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अरुण काळे याने दोन्ही मुलांना घरी आणले होते. या मुलांना पत्नीच्या माहेरी घेऊन जात असताना अरुण काळे याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत चार मुलांसह आत्महत्या केली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.