Lalit Patil Drugs Case : कारवाईचा वेग वाढला! ललित पाटील प्रकरणात आणखी एक गजाआड
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. या प्रकरणात दोन महिलांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. ललित पाटीलाचा नाशिक रोड येथील कारचालक मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत हा कारचालक ललितबरोबर होता असा पोलिसांना संशय आहे. याआधी पुणे पोलिसांनी काल ललित पाटीलच्या दोन साथीदार महिलांना अटक केली होती. त्यानंतर आज आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी..
मुंबई पोलिसांनी काल रात्री उशीरा या कारचालक व्यक्तीला अटक केली. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर त्याला विविध ठिकाणी पळून जाण्यात या कारचालकाने मदत केली होती. हा व्यक्ती ललित पाटीलला सतत मदत करत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी अखेर या व्यक्तीला अटक करण्याचे ठरवले.
ललित पाटीलसह 2 महिलांना पोलीस कोठडी
दरम्यान, पुण्यातील ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) चेन्नईत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम (Archana Kiran Nikam) आणि प्रज्ञा अरुण कांबळे (Pragya Arun Kamble) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन महिलांना पुणे पोलिसांनी काल नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे अशी या आरोपी महिलांची नावं आहे.
Letsupp Special : ललित पाटीलने किती मंत्र्यांना अडचणीत आणले?
ललित ससूनमधून गेल्यानंतर तो नाशिकमध्ये मुक्कामाला होता. या ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था या दोघांनी केली होती. फोनच्या माध्यमातून ललित हा या महिलांच्या संपर्कात होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, त्यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघींना चार दिवसांची म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.