Letsupp Special : ललित पाटीलने किती मंत्र्यांना अडचणीत आणले?
पुणे : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे ते सगळं सांगणार” असं म्हणतं ललित पाटीलने (Lalit Patil Arrest) अटक होताच मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधकांकडून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ललित पाटील फरार झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. याच सगळ्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर ललित पाटील या एका व्यक्तीने नक्की किती मंत्र्यांना अडचणीत आणले याचा लेट्सअप मराठीने आढावा घेतला. (Lalit Patil has put many ministers in trouble along with Devendra Fadnavis, Hasan mushref, Shambhuraj desai)
1. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस :
मुळात ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला तरी तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. रुग्णालयात पोलिस निरीक्षकांसह जवळपास 112 गार्ड ड्युटीवर असतात. या सर्वांकडेच कैद्यांच्याच वॉर्डची देखरेख करण्याची जबाबदारी असते. एवढ्या सुरक्षेमधूनही ललित पाटील पळाला कसा, गृह विभाग काय करत होते? असा सवाल करत विरोधकांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते. याशिवाय ललित पाटील हा रुग्णालयाच्या आवारातूनच अमली पदार्थाचे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले होते.
या सगळ्यासाठी त्याला नेमके कोण मदत करत होते? पोलिसांच्या एवढ्या सुरक्षेमध्येही तो हे रॅकेट कसे चालवू शकत होता? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
2. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ :
ससुन रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित येते. ललित पाटील तब्बल 9 महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला असा नेमका कोणता आजार झाला होता? त्याच्यावर नेमके कोणते उपचार सुरु होते? पळून जाण्यापूर्वी ललितवर एक शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी एक पोलिस हवालदार त्याला ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला. त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला. त्यामुळे त्याच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करायची होती? असे अनेक सवाल विरोधकांनी विचारले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर दोन आयफोन मिळवले होते. पोलिसांच्या मते यातील एका फोनची किंमत तब्बल 1.1 लाख रुपये होती. याच फोनचा वापर करुन तो हे रॅकेट चालवत होता. ललित पाटीलने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तो पैशांच्या जोरावर रुग्णालय प्रशासनामधील अधिकारी आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना मॅनेज करत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याचं रुग्णालय प्रशासन आणि पुणे पोलिसांनी येरवडा कारागृह प्रशासनाला तब्बल दीड तास कळवलचं नव्हतं.
ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार; फडणवीसांचा इशारा
3. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे :
ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर आधी वाकड आणि तिथून मुंबई गाठले. तिकडून तो नाशिकला गेला. नाशिकमध्ये तो अंमली पदार्थ तयार करणारी फॅक्टरी चालवत होता. यामुळे त्याचे नाशिक कनेक्शन समोर आले होते. नाशिकमध्ये तो बराच वेळ मुक्कामीही होता. अशातच ललित पाटील याच्यासाठी फोन केल्याचा आरोप विरोधकांनी दादा भुसे केला गेला. या सगळ्यादरम्यान, ललित पाटील 300 कोटींची फॅक्टरी चालवत होता, तिथून राज्यात एमडी सप्लाय होत होते. हे जर दादा भुसेंना माहित नसेल तर ते पालकमंत्री म्हणून फेल आहेत. जर माहित असेल तर त्यांनी ते चालू कसे दिले? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
4. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई :
राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून शंभुराज देसाई फेल आहेत, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यांच्या या आरोपांवर त्यांच्या या आरोपांनंतर देसाई यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांना आरोप सिद्ध करा अन्यथा मागे घ्या, असे आव्हान दिले. ते म्हणाले, मी ललित पाटीलला ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात आले. सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यामुळे लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे. तसंच या प्रकरणात माझा थोडा संबंध जरी सापडला तरी मी राजकारण सोडेल असंही आव्हान देसाई यांनी दिले.
पुण्यातून पळालेला ललित पाटील मुंबई पोलिसांना कसा सापडला? वाचा इनसाईड स्टोरी
शेकडो अधिकारी अडचणीत :
दरम्यान, ललित पाटील याच्यामुळे पोलीस खाते, ससून रुग्णालय, येरवडा कारागृह प्रशासन यातील अनेक बडे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला रुग्णालयात एवढे दिवस ठेवण्यामुळे, त्याच्या रुग्णालयातील हालचालींवर लक्ष न ठेवता आल्यामुळे, रुग्णालय आवारात सुरु असलेले अंमली पदार्थांचे रॅकेट, त्याला मिळत असलेल्या सोयी-सुविधा, तो पळून गेल्यानंतर दाखवलेला हलगर्जीपणा या सगळ्यामुळे अनेक बडे अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णालयात बंदोबस्ताला असणाऱ्या 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.