भाजप-मनसे युती होणार का ? ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य म्हणाले, हिंदुत्वावर आमचे..
Devendra Fadnavis on BJP-MNS Alliance : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी भाजपला पूरक ठरतील अशा भूमिका अनेकदा घेतल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात होत असतात. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभागी झालेल्या फडणवीस यांना नव्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्दयावर आमचे विचार जुळतात हे खरं आहे मात्र युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
शिवसेनेच्या पडझडीला महिला मोर्चा सांभाळणार? उद्धव यांच्या मदतीसाठी रश्मी ठाकरे मैदानात
तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरे यांना सतत भेटत असता तेव्हा युती होणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, राज ठाकरे हे आमचे जुने मित्र आहेत. एका वेळी त्यांचे राजकारण संकुचित होतं. महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल बोलणे योग्यच आहे. मराठी भाषेचा मुद्दा मांडलाच पाहिजे. पण, इतरांना विरोध करून नको, अशी आमची भूमिका होती. देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये असे आम्हाला वाटते.
ते म्हणाले, राज ठाकरे यांनी सध्या भाषेचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. ते व्यापक हिंदुत्वावर बोलत असतात. ही आम्हाला जोडणारी गोष्ट आहे. असे असले तरी आमच्यात युतीबाबत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.