हल्ल्यामागे कुणाचा हात, हे सगळ्यांनाच माहित; संदीप देशपांडेंचा रोख कुणाकडे ?
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी आता स्वतः देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ‘अशा हल्ल्यांमुळे मी आजिबात घाबरणार नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. घाबरणारही नाही. आम्ही कुणाला भीक घालत नाही. अशा हल्ल्यांमुळे मी माझे काम थांबविल असे वाटत असेल तर ते होणार नाही. यामागे कुणाचा हात आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे,’ असे देशपांडे यांनी सांगितले.
हेही वाचा : Sandeep Deshpande : हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा; मनसे नेत्याची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी क्रिकेटते स्टम्पच्या सहाय्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हातापायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील देशपांडे यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
गृहमंत्री फडणवीसच जबाबदार.. देशपांडेंवर हल्ला म्हणजे कायदा सुव्यस्थेचे बारा; अंधारेंचा हल्लाबोल
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यामागे कोण आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हल्ल्यामागे नेमके कोण आहेत, देशपांडे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.