Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंशी युती करणार? राज ठाकरे म्हणाले, मनसेने प्रस्ताव…
Raj Thackeray : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतील घालमेल वाढली आहे. आघाडीतील घटक पक्ष नवीन मित्राची शोधाशोध करत आहेत. यातच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चा खऱ्या नाहीत. ठाकरे गटाकडे असा कोणताच प्रस्ताव ठेवला नसल्याचे खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही मनसेकडून असा कोणताच प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकरे आणि मनसे युतीच्या फक्त चर्चाच होत्या हे आता स्पष्ट झाले आहे.
CM शिंदेंचे नाराज आमदारांना 5 मेसेज; ‘वर्षा’वरील बैठकीत काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
नेमकं काय घडलं?
मनसे नेते यांनी आज खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर राऊत लगेचच उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी तर दुसरीकडे पानसे राज ठाकरेंच्या निवासस्थानाकडे निघून गेले. या घडामोडींनंतर मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पानसे यांनी राऊतांची भेट घेतली त्यावेळी दोघांत पंधरा मिनिटे चर्चा झाली. याआधी भांडूप ते सामना कार्यालयापर्यंत एकत्र कारने त्यांनी जवळपास सव्वा तास प्रवास केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या दोघांत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मी कोणताच प्रस्ताव दिला नाही – पानसे
दरम्यान, स्वतः पानसे यांनीही याबाबत खुलासा केला आहे. मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी लहान माणूस आहे. राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. संजय राऊत आणि माझी जुनी ओळख आहे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. म्हणून त्यांना भेटलो असे पानसे म्हणाले.