‘ते आलेत दोन नंबरला बसलेत आता, शिंदेंना ढकलून’.. फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचे टोले

‘ते आलेत दोन नंबरला बसलेत आता, शिंदेंना ढकलून’.. फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचे टोले

Jayant Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोले लगावले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, त्यांच्या मी पुन्हा येईनची भीती एकनाथ शिंदेंना असली पाहिजे आम्हाला नाही. ते पुन्हा येईन म्हणत आहेत म्हणजे ते आलेलेच आहेत फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. मी पुन्हा येईन म्हणत आहेत म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना बाजूला ढकलून ते जर आता मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदेंनी करायला पाहिजे. एकनाथ शिंदेंबरोबर जे चाळीस वीर गेलेले आहेत त्या सगळ्यांनी आता चिंता केली पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला

राज्यात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. केंद्र सरकारने कामगार कायदे बदलले आहेत त्यामुळे तीनशेहून कमी कामगार असलेल्या ठिकाणी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यातून कामगारांचे शोषण होत आहे.

त्याप्रमाणेच बारसू येथील कामगारांचे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये, तसेच तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. यासाठीच आज उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे भेट दिली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच या प्रकल्पातून पर्यावरणाची हानी होणार नाही असा विश्वास स्थानिकांना झाल्यास स्थानिक लोकच प्रकल्पाला मान्यता देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक लोकांचे समाधान करण्याचे तारतम्य सरकारने बाळगले पाहिजे. नाणार येथेही लोकांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक होते ते कदाचित झाले नसावे. लोकांची समजूत घालणे, त्यांना विश्वासात घेणे हे कोणत्याही विकासमार्गाचे पहिले पाऊल आहे. ते जर सरकार टाळून रेटारेटी करत असेल तर अनेक प्रश्न तयार होतात. यातून स्थानिकांना हा प्रकल्प आपल्या विरोधी असल्याचे वाटतं, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube