अजितदादा भाजपात जाणार का ?, दमानियांच्या ट्विटवर पवारांचे एकाच वाक्यात उत्तर
Sharad Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदाच बोलले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दमानिया यांनी ट्विट करून दिली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे.
Ramdas Athawale : राजकारणात काहीही होऊ शकतं, अजित पवार रिपाईंत आले तर त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेला असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर पवार यांनी स्पष्टीकरण दिले. मला त्याबाबत काहीही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यापेक्षा आधिक भाष्य करणे त्यांनी टाळले. त्यामुळे त्यांनी हा नाकारला किंवा आणखी काही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या या वक्तव्याने आघाडीतील संभ्रमाची स्थिती कायम राहिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
या प्रकरणी काल खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, ‘भाजपकडून अजित पवार यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. याआधीही त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते. ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजून तरी मत मांडण्याचा अधिकार या देशात आहे. त्यांचं ट्विट मी काही वाचलेलं नाही. मात्र त्यांनी काही लिहीलं असेल तर त्यांना अधिकार आहे.’
अजित पवार खरेच भाजपात जाणार का ?, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘पंधरा मिनिटात येथे मुळशीत पाऊस पडेल का ?, याचे उत्तर माझ्याकडे नाही. आता तर येथे ऊन आहे हे मी सांगू शकते. पण, पंधरा मिनिटांनंतर पाऊस पडेल की नाही ?, हे मी सांगू शकत नाही.’
एखादी नोकरी असेल तर संजय राऊतांना द्या; राणेंनी उडवली राऊतांची खिल्ली
अंजली दमानियांचा दावा काय ?
दमानिया यांनी आज सकाळी एक ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत.. तेही लवकरच बघू.. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे ट्विट त्यांनी केले.
या ट्विटनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या ट्विटवर अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता असून इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल काय बोलणार ? असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले.