काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल
शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने धमकावल्याचा खळबळजनक दावा माजी सीईओ जॅक डॉर्सी (jack Dorsey) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ट्विटर फाइल्स हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काँग्रेसचे नेते प्रवक्ते पत्रकार परिषदा घेऊन सरकावर हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, की ट्विटरचे माजी सीईओ म्हणतात भाजप सरकारने मायक्रोब्लॉगिंग साइटवरील शेतकरी आंदोलनासंबदर्भातली माहिती हटविण्यासाठी दबाव आणला तसेच गंभीर परिणामांचा इशारा दिला. भाषण स्वातंत्र्य आणि सरकारवर टीका करणे हा आता गुन्हा झाला आहे. लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Former Twitter CEO #JackDorsey says BJP Govt pressurised the microblogging site to delete content around #FarmersProtest & warned of dire consequences. Free speech & criticism of Govt has become a crime. Is Democracy alive? @NCPspeaks pic.twitter.com/A46nBjjQfr
— महेश तपासे Mahaesh Tapase (@maheshtapase) June 13, 2023
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दबाव टाकला जात होता, असा दावा ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता.
भाजप-काँग्रेस जुंपली
यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून सरकारला घेरले आहे. त्यांचे प्रवक्ते पत्रकार परिषदा घेत सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे भाजपनेही हल्लाबोल सुरू केला आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसला प्रश्न विचारले. काँग्रेस आणि विपक्ष या खोट्या दाव्यांमुळे इतके उत्साहित का होत आहेत? भारताविरोधात वक्तव्ये करणाऱ्यांसोबत जाण्याचे काय कारण आहे? असे प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारले आहेत.