पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम नाहीच; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येतच आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत यावर सावध प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, शरद पवार यांनी हा निर्णय का घेतला, याबाबत तेच सांगू शकतात. जिथे शरद पवार आहेत तिथे राष्ट्रवादी पक्ष आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, 1990 च्या दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. मात्र त्यावेळी शिवसैनिकांचा रेटा इतका जबरदस्त होता की त्यांना त्यांचा निर्णय मागे घेत पुन्हा शिवसेनाप्रमुख पद स्वीकारावे लागले होते. या घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे.
पवारांनी घेतलेल्या या निर्णयांसदर्भात आता त्यांच्या पक्षाच्या बैठका सुरू आहेत. सध्या त्यांचा पक्ष गोंधळलेल्या अवस्थेतड आहे. म्हणून आजच आम्ही पवारांकडे जाऊन त्यांना भेटणे योग्य होणार नाही. पण आमचा संवाद सुरू आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. आघाडीवर परिणाम होईल असा काही संबंध तुम्हीही जोडू नका, असे राऊत यांनी पत्रकारांनाही सांगितले.
शरद पवारांच्या या निर्णयामागे कुटुंबातील कलह आहे असे मला वाटत नाही. कारण, शरद पवार यांच्या नावावरच पक्ष आहे. जिथे पवार आहेत तिथे त्यांचा पक्ष, हे ठरलेले आहे. पवार यांनी हा निर्णय का घेतला हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी काहीच बोलणार नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा
ते पुढे म्हणाले, मला ही राजकीय खेळी आहे असे वाटत नाही. शरद पवार नेहमीच राजकारणातील शिखरपुरुष राहिल आहेत. त्यांनी फक्त आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, असेही राऊत म्हणाले.