…म्हणजे ‘वरातीमागून घोडे’, Mahesh Tapase यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे, असंच म्हणावं लागणार असल्याचा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवरुन तपासेंनी ताशेरे ओढले आहेत.
तपासे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय अर्थसंकल्पात सूचना कशा जोडू शकतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प आहे हे आठवतं का? असा सवालही तपासे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकास कामांबाबत गंभीर असते तर त्यांनी किमान महिनाभरापूर्वी सर्व खासदारांची बैठक बोलावायला हवी होती. त्यांनी केंद्र सरकारच्या सर्व प्रकल्पांचा आणि विविध योजनांसाठीच्या आर्थिक वाटपाचा आढावा घ्यायला हवा होता, असंही त्यांनी म्हंटलय.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे पब्लिसिटी स्टंटशिवाय दुसरे काही नाही, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.