प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याची पद्धत कायम असल्याचे दिसत आहे.
Major changes in administration : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरूच असून बुधवारी सायंकाळी पाच बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. गेल्या दोन आठवड्यांत ही तिसरी मोठी बदल्याची फेरी ठरली आहे. राज्यात प्रशासनात सातत्याने फेरबदल होत असून, कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याची पद्धत कायम असल्याचे दिसत आहे.
या नव्या बदल्यांमध्ये डॉ. बी. एन पाटील यांचं संचालक पर्यटन, मुंबई येथून संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. मंगेश जोशी यांची उपमहासंचालक, यशदा, पुणे येथून संचालक, पर्यटन, मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. कुलदीप जंगम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर येथून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. कुशल जैन यांची गडचिरोली येथून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेवैया डोंगरे यांना धाराशिव येथून प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा व सहायक जिल्हाधिकारी, केळापूर (यवतमाळ) येथे नियुक्त करण्यात आले आहे.
महिला आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंबा, पण मतदारसंघ फेररचनेवर विरोध; राजधानी दिल्लीतील राजकारण तापलं
दरम्यान, यापूर्वीच गेल्या आठवड्यात 13 IAS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या होत्या. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाली, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे एस. कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. राजेंद्र भारुड यांची कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी, तर डॉ. जसमीन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
तसेच विनय गौडा यांची चंद्रपूरहून छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, तर वस्तुमना पंत यांची चंद्रपूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. गोंदिया जिल्हाधिकारीपदी डॉ. मंगेश गोंदवले यांची नियुक्ती झाली असून भारत बास्टेवाड यांची लातूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. अंजली शर्मा यांची जालना महापालिका आयुक्तपदी, मिन्नू पी.एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्षा लढ्ढा यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी, तर संजीता मोहपात्रा यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
राज्यातील प्रशासनात सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण बदल्यांमुळे धोरणात्मक आणि कार्यकारी स्तरावर मोठे फेरबदल होत असल्याचे दिसत असून, याचा प्रशासनाच्या कामकाजावर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.