Download App

मराठा आरक्षण : ‘खोतकर, कुचे, अन् महाजन…’; CM शिंदेंना हातातून गेलेली मॅच जिंकवून देणारे 3 शिलेदार

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 17 दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर काल (14 सप्टेंबर) संपुष्टात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे ज्यूस पिऊन उपोषण सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. संपूर्ण राज्यभर गाजलेले हे उपोषण मागे घेतल्याने शिंदे सरकारचाही जीव आता भांड्यात पडला आहे. मात्र जरांगेंना ज्यूस पाजण्यासाठी शिंदे सरकारला प्रचंड मेहनत करावी लागल्याचे दिसून आले. गेल्या बारा दिवसांमध्ये मंत्री गिरीश महाजन, आमदार नारायण कुचे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिवस-रात्र एक करुन केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि चर्चेच्या सात फेऱ्यांनंतर आंदोलनाचा पेच सोडविण्यात यश आले आहे. (Manoj Jarange Patil’s 17-day hunger strike to demand Maratha reservation finally ended)

मराठा आरक्षणाची मागणी करत अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. प्रकृतीचे कारण देत एक सप्टेंबरला पोलिस प्रशासनाने जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र,ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांवर दगडफेक झाली तर पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीमार केला. या दोन्ही घटनांमध्ये अनेक आंदोलनक आणि पोलिस जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर राज्यातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. मराठा समाजातील अनेक नेते आणि नागरिक अंतरवाली सराटीमध्ये रोज दाखल होत होते.

चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त

आंदोलनाला वाढलेला पाठिंबा पाहून हे उपोषण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या. चर्चेच्या सहा फेन्यांसह दोन अध्यादेशही काढले. त्यानंतर सातवी फेरी मुंबईत झाली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंत्र्यांबरोबर मुंबईत बैठक झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तीनवेळा शिष्टाई केली. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांनी बंद लिफाफ्यात दुसऱ्यांदा काढलेला अध्यादेशही आणला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही राज्य शासनाकडून चर्चेसाठी आले.

त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.मात्र, त्यांचाही दौरा अचानक रद्द झाला. परंतु, मुख्यमंत्री येणार अशी चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर बुधवारी रात्री अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नारायण कुचे आंदोलनस्थळी दाखल झाले. तिथून सर्वांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) पहाटे तीन वाजेपर्यंत मनोज जरांगे आणि आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली. आंदोलक आणि राज्य शासनाच्या बैठकीत मागण्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले.

मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज? अमृत महोत्सवानिमित्त शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट

त्यानंतर महाजन यांनी पहाटेच ऑलवेलचा निरोप मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. त्यामुळे सकाळी मुख्यमंत्री येणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. अखेर पहाटे 5 वाजताच्या दरम्यान, प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आला आणि त्यानंतर पोलिस प्रशासनाची लगबग सुरू झाली. मुख्यमंत्री शिंदे सकाळी आंदोलनस्थळी आल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले. पण ते येण्यापूर्वी आमदार कुचे यांनी उपोषण सोडविण्यासाठी फळाच्या रसाची व्यवस्था करून ठेवली होती.

दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात उपोषण सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने मराठा समाजाचे तारणहार अशी स्वतःची प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाल्याची चर्चा आहे. यापूर्वीही पोलिसांवरील कारवाई, अध्यादेशाबद्दलची माहिती अशा गोष्टींची घोषणा करण्यासाठी स्वतः शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. कदाचित याचमुळे आंदोलनकर्ते जरांगे-पाटील यांनीही शिंदे यांच्या हातूनच मराठा समाजाचे प्रश्न सुटतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या उपोषणापासून स्वतःला लांब ठेवल्याने या हातातून निसटलेल्या सामन्याला शिंदे यांनी एकहाती जिंकल्याचे चित्र महाराष्ट्रात तयार झाल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us