बावनकुळेंच्या सभेत राडा : मराठा तरुणाच्या घोषणा; भाजप कार्यकर्त्यांची पत्रकारांना धक्काबुक्की
डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या सभेत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलकांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. बावनकुळेंच्या सभेत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एका तरुणाने घोषणाबाजी केली. त्यावर बावनकुळे यांनी भर व्यासपीठावर बोलवून संबंधित तरुणाला समज दिली. त्यानंतर तरुणाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनीही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार यावेळी घडला आहे. (Maratha reservation protestors protest in BJP state president Chandrasekhar Bawankule’s rally)
सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका : आमदार अपत्रातेप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रशेखर बावनकुळे हे ‘संपर्क ते समर्थन’ अभियानांतर्गत कल्याण – डोंबिवलीत आले होते. यावेळी कार्यक्रम सुरु असतानाच एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हे पाहून संतप्त बावनकुळे यांनी संबंधित तरुणाला स्टेजवर बोलावत समज दिली. त्यानंतर हा तरुण व्यासपीठावरून खाली उतरत असताना पत्रकारांनी त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. शिवाय त्या तरुणाला प्रतिक्रिया देण्यास मज्जाव करत माईकसमोरून अक्षरशः ओढत बाजूला नेले.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन
या प्रकरणी सर्व पत्रकारांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांची माफी मागितली. पत्रकारांना धक्काबुक्की कोणी केली याचा शोध घेतला जाईल, जर यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आढळल्यास, तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आमच्या आजच्या कार्यक्रमात कुणाचा अवमान झाला असेल, कोणाला धक्काबुक्की झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण :
मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. यात कुणबी दाखले आणि रद्द झालेले आरक्षण पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.