मराठवाड्यातील लोकसभेचे आठही उमेदवार भाजप चिन्हावर विजयी होतील; सावेंचा दावा
औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अर्ध्याहून आमदार हे भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच केला होता. त्यानंतर आता भाजपकडून वेगळीच राजकीय खेळी केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दाव्यावरून उघडकीस आले आहे. मराठवाड्यातील लोकसभेचे आठही उमेदवार भाजप चिन्हावर विजयी होतील, असा दावा सावे यांनी केलाय.
भाजपने राज्यातील महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची औरंगाबाद येथे आज संध्याकाळी सभा होत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहे. या सभेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपची मराठवाड्यात ताकद नाही. त्यांना मराठवाडामध्ये उमेदवार मिळणार नाही, असा आरोप दानवे यांनी केला. सभेची तयारीची पाहणी केल्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे यांनी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. राऊत रोज काही आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये काही तथ्य नाही. मराठवाड्यामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. त्यामुळे भाजपकडे उमेदवार देखील आहेत. कमळाच्या चिन्हावर हे उमेदवार निवडून येतील, असा दावाही सावे यांनी केला आहे. भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीही अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे.
आता सावे यांच्या दावाने नवीन वाद निर्माण होऊ शकतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन मंत्री मराठवाड्यातील आहेत. त्यात सावे यांच्या या दाव्याने शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.