बदली झाल्यानंतरही अविनाश पाठकने आदेश काढले; मोबाईल रेकॉर्डिंगमुळे 241 कोटींचा घोटाळा कसा उघडकीस आला ?

Avinash Pathak -अविनाश पाठक याला अटक झाली असून, 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Avinash Pathak

Avinash Pathak IAS Arrest : बनावट आदेशाने 68 कोटी रुपयांचा भूसंपादन (Beed land Acquisition) मावेजा (मोबदला) तब्बल 310 कोटी रुपयांवर नेऊन 241 कोटींच्या घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तत्कालीन बीड जिल्हाधिकारी व आयएएस अधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) याला अटक झाली असून, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पाठक याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षाकडून अॅड. योगेश सरवदे व तपास अधिकारी तथा भारतीय पोलिस सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी व्यंकट राम यांनी न्यायालयात बाजू मांडली. अविनाश पाठककडून अॅड. कालिदास थिगळे, अॅड. कांकरिया, अॅड. मिलींद वाघीरकर यांनी बाजू मांडली. एसआयटीचे प्रमुख अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर उपस्थित होते.

गायब संचिका, लॅपटॉप अन॒ आवाजाचे नमुने
जिल्हाधिकारी म्हणून बदलीनंतर काही लवाद आदेश काढल्याचे नोंदीतून समोर आले आहे. पाठक याने हा आदेश स्वत:च्या लॅपटॉप व संगणकावर टाईप केलेले असल्याने त्यांची जप्ती तसेच घोटाळ्यातील 154 पैकी 148 संचिका सापडल्या आहेत. उर्वरित संचिकांचाही शोध, लॅपटॉप व संगणक जप्ती केले आहेत. हा घोटाळा मोबाईलमधील रेकॉर्डींगमुळे समोर आल्याने पाठकच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी एसआयटीने अविनाश पाठकच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.
—-
पाठक, हंगेचे लोकेशन एकत्र
पाठक यांच्या बदलीनंतर या घेाटाळ्यातील अटकेतील आरोपी संजय हंगे व पाठक यांचे लोकेशन एकत्र आढळले आहे. हा पुरावा न्यायालयासमोर व्यंकट राम यांनी मांडला. स्वाक्षऱ्यांच्या फॉरेन्सिक तपासण्यांचा अहवालही सादर करण्यात आला. त्यामुळे त्याच्या लातूर, मुंबई येथील ठिकाणांच्‍या पंचनाम्यासाठी देखील पाठकला कोठडी मागण्यात आली.

पाठकच्या वकिलांच्याही जोरदार हरकती
हस्ताक्षराबातचा अभिप्राय सांगीतला जात असला तरी तो नेमका काय याचा उल्लेख नाही. या प्रकरणात दाखल 200 पानांच्या दोषारोपपत्रात कॉल रेकॉर्डमध्ये आरोपी पाठकचा एकही फोन नाही. लॅपटॉप, संगणक शासनाचे असल्याने बदली होताच सोडलेले असल्याने त्याचाही संबंध नाही. पाच जानेवारीला साक्षीदार म्हणून 10 पानांचा त्यांनी जबाब नोंदविला आहे. चौकशीला कधीही तयार आहेत, कोणतीही संचिका लवादाकडे राहत नाही, यासह पोलिसांकडे सगळे कागदपत्र असतानाही पाठकचा सहभाग शोधायला येवढा वेळ का लागला ? अशा हरकती पाठकच्या वकिलांनी मांडल्या. त्यांनी विविध दाखलेही न्यायालयासमोर दिले.

कोणी कोणी घोटाळा केला ?
भूसंपादन मावेजाच्या 154 प्रकरणात लवाद आदेशाने 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मावेजा दिल्याची फिर्याद उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिली. यावरुन सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे, कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण, कंत्राटी ऑपरेटर शेख हजहर शेख बाबू, निवृत्त कंत्राटी कर्मचारी त्रिंबक पिंगळे, सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यासह अॅड. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसुरे, अॅड. राख या 10 जणांवर गुन्हा नोंद झाला. यातील संजय हंगे, त्रिंबक पिंगळे व शेख अजहर या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. तांत्रिक तपासात तत्कालिन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकारी अविनाश पाठकचा सहभाग आढळला आहे. त्यावरुन त्याला गुरुवारी रात्री (ता. आठ) शिवाजी नगर पोलिस ठाण्यात अटक केलीय.

follow us