दिल्लीतले लोक सांगतात, ती बाई; पाचशे कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून जरांगेंचा मोठा दावा
Manoj Jarange-मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून एकनाथ शिंदेंना इशारा दिला. 'माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे आहेत', असा मोठा दावा केला.
Manoj Jarange : पाचशे कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्यानंतर सरकारने या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सदस्यीय विशेष तपास स्थापन केलेले आहे. याबाबत चौकशी सुरू झाल्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात सत्य बाहेर काढण्याची मागणी करत जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) इशाराही दिला आहे. ‘माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे आहेत. वेळ आली की फोडणार’, असा दावा त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर पुन्हा भाष्य केले. ही क्लिप खरी असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ‘दिल्लीतले लोक म्हणतात की, ती बाई खोटे बोलू शकत नाही. ती क्लिपमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने बोलत आहे’, असे जरांगे म्हणाले.
‘500 कोटींची ऑडिओ क्लिप खरी’
500 कोटींची ही ऑडिओ क्लिप खरी आहे. या प्रकरणात संबंधित दोघांनी पुढाकार घेऊन सत्य बाहेर आणायला हवे. या कथित क्लिपमुळे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही क्लिप एआयद्वारे तयार केलेली नसून खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘या प्रकरणात एखादा गरीब व्यक्ती असता, तर आतापर्यंत त्याला तुरुंगात टाकले असते. मात्र, संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याने कारवाई झालेली नाही’, असा आरोपही जरांगे यांनी केला
गुन्हा दाखल नसताना एसआयटीची चौकशी
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, तरीही एसआयटी चौकशी सुरू करण्यात आल्याचा दावा जरांगे यांनी केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी चौकशी सुरू होणे ही देशातील आणि राज्यातील पहिलीच एसआयटी असल्याचे ते म्हणाले. ‘याचा अर्थ ही क्लिप खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा विषय छोटा नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाला किती गांभीर्याने घेतले आहे, याची आम्हाला कल्पना नाही. मात्र, या प्रकरणाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात अपयश आले, तर त्याचे परिणाम गावखेड्यातील आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना भोगावे लागतील, असेही त्यांनी म्हटले.
‘माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे’
‘तुम्ही हा विषय सोडून दिलात, तर पुढे आणखी किती प्लॅन्स आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का? मला माझ्याबद्दल माहिती आहे. माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे आहेत. वेळ आली की फोडणार’, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदेंना जरांगेंचा सल्ला
ज्याला कर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? तुम्ही काही घेतलेच नाही, तर तुम्ही का घाबरता? तुमच्यामुळे त्यांचे आहे, त्यांच्यामुळे तुमचे नाही. मग तुम्ही गप्प का बसला आहात?’, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. आपल्यासंबंधी कुठे विषारी षड्यंत्र रचले जात असेल, तर त्याठिकाणी आपण उपस्थित राहून सत्य समोर आणायला हवे, असेही जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना सुचवले.