मोठी बातमी: कामगार दिनाची सुट्टी शेवटची ठरली; पोहायला गेलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू

sambhajinagar -शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) असे मृत झालेल्या तिघांचे नावे आहेत.

Sambhajinagar Labour

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पोहण्यासाठी गेलेले शाळकरी मुले, तरुण हे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) कामगार दिनाच्या दिवशी एक दुर्देवी घटना घडली आहे. शहराजवळील एका धरणात पोहायला गेलेल्या नऊ पैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण बचावले आहेत. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) असे मृत झालेल्या तिघांचे नावे आहेत. त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. हे सर्वजण 25 ते 30 वयोगटातील आहेत. सध्या रांजणगाव शेपू वाळूज एमआयडीसी येथे कंपनीत काम करत होते. शुक्रवारी कामगार दिनानिमित्ताने सुट्टी असल्याने एकमेंकाचे मित्र असलेले सर्वजण हे शहराजवळील टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी गेले होते. नऊ ही जण पाण्यात उतरले होते. परंतु त्यातील तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडाले. इतर सहा जण पाण्याबाहेर आल्याने ते बचावले आहे. या कामगारांनी आरडा-ओरड केल्यानंतर धरणाजवळील लोकही मदतीला आले होते. तोपर्यंत तिघेही बुडाले होते.

ही माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल घटनास्थळी आले. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अनेक जणांचा बुडून मृत्यू
गेल्या चार दिवसांपासून पाण्यात बुडून मृत्यू होण्याची घटना वाढत आहे. उन्हाळ्याच्या शाळांना सुट्टा असल्याने अनेक जण गावातील तलाव, विहारीमध्ये पोहण्यासाठी जात आहे. परंतु पोहता येत नसल्याने किंवा पाण्याचा अंदाज आल्याने अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावात दोन विद्यार्थी व एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. तर पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

follow us