नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! नोटीस मिळताच मतीन पटेल वकिलांसह हजर, SIT कडून कसून चौकशी

निदा खान हिलाआश्रय दिल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झाला.

  • Written By: Published:
Untitled Design 98 1

Matin Patel appeared with his lawyers upon receiving the notice. : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील कथित कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान हिला फरारी काळात बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल अखेर आज नाशिक पोलिसांसमोर हजर झाला आहेत. सध्या नाशिक पोलीस आयुक्तालयात विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, गेल्या दोन तासांपासून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी निदा खान ही नाशिकमधून फरार झाली होती. या काळात तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यात आल्याचा आरोप आहे. मतीन पटेल याने तिला स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यावेळी मतीन पटेल पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

दरम्यान, या प्रकरणात नाशिक रोड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेने मतीन पटेल याला थेट कायदेशीर नोटीस बजावली. कायदेशीर कोंडी वाढत असल्याचे लक्षात येताच अखेर त्याने नरमाईची भूमिका घेत आज, 25 मे रोजी आपल्या वकिलांसह नाशिक पोलिसांसमोर हजेरी लावली.

पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी; आंदोलन-मोर्चांवर बंदी, इंधन बचतीसाठी मनपाचे कठोर आदेश

सध्या एसआयटीकडून मतीन पटेल याची सखोल चौकशी सुरू आहे. निदा खानला नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून घर उपलब्ध करून देण्यात आले? ती ज्या घरात राहत होती त्या घराचा मूळ मालक कोण? यासह अनेक मुद्द्यांवर तपास पथक माहिती गोळा करत आहे. संबंधित घरमालकाचाही जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर मतीन पटेल याला अटक केली जाणार की त्याला दिलासा मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून मतीन पटेल याच्या घर आणि कार्यालयावर कारवाई करण्यात आली होती.

दुसरीकडे, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबतही धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याने पीडितेकडून दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप असून, एसआयटीने त्याचे बँक खाते सील केले आहे. फसवणुकीसंदर्भातील सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात येत असून, लवकरच या प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज दुपारच्या सत्रात नाशिक रोड न्यायालयात मुख्य आरोपी निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून न्यायालय काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

follow us