Jategaon Phata : जातेगाव फाट्यावर भरदिवसा दूध चालकावर हल्ला; मानेवर सपासप वार अन्…
Jategaon Phata : खर्डा परिसरात शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या थरारक हत्येने खळबळ उडाली आहे. जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ सकाळी
Jategaon Phata : खर्डा परिसरात शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या थरारक हत्येने खळबळ उडाली आहे. जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ अनोळखी इसमांनी दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांपैकी एकाने कोयत्याने मानेवर सपासप वार केल्याने तानाजी भास्कर बोराडे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी बोराडे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तानाजी बोराडे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअप वाहनावर चालक म्हणून काम करत होते. एमएच १२ केपी ५६२६ क्रमांकाच्या वाहनातून ते दररोज परिसरातील दूध संकलित करून खर्डा येथे आणत होते. शुक्रवारीही नेहमीप्रमाणे दूध वाहतूक केल्यानंतर ते आपल्या कामासाठी निघाले होते. याचदरम्यान काही व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतले.
एकापाठोपाठ झालेल्या वारांमुळे बोराडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले
फाट्याजवळ पोहोचताच बोराडे यांचा संशयितांशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर मारामारी सुरू झाली. काही कळण्याच्या आतच एका हल्लेखोराने हातातील कोयत्याने बोराडे यांच्या मानेवर जोरदार वार केले. एकापाठोपाठ झालेल्या वारांमुळे बोराडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून धूम ठोकली. मुख्य रस्त्यालगत भरदिवसा घडलेल्या या हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी बोराडे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना दिलासा
हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू
घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले असून, न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान, बोराडे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हत्येमागे जुने वैमनस्य आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. भरदिवसा गर्दीच्या रस्त्यालगत कोयत्याने वार करून झालेल्या या हत्येने खर्डा परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत.