2014 आणि 2017 साली धोका मग आता विश्वास कसा ठेवायचा? मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात युती होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र आता एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी देखील दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावं अशी साद घातली आहे. तर आता यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

या वेळी संदीप देशपांडे म्हणाले की, 2017 साली श्रीधर पाटणकर हे मला भेटले आणि दोन्ही ठाकरेंना एकत्र यावे असं सांगितलं. त्यांच्या प्रस्तावावर मी राज ठाकरेंशी बोललो आणि नंतर पाटणकरांना निरोप देण्यात आला. आमच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायले गेले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की आता त्यांचे भाजपसोबत लग्न तुटणार आहे आणि नंतर आपला साखरपुडा करू. नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडली. पण नंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलायचे बंद केले.

तसेच 2014 सालीही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एकत्र लढूयात असं सांगितलं. आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि त्यांच्याकडून अनिल देसाई चर्चा करायचं ठरलं. त्यावर राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले. पण त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी फोन उचलायचे बंद केले. असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत काय म्हणाले?

तर खासदार संजय राऊत यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. ते सुद्धा ठाकरे आहेत आणि हे सुद्धा ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत. नातं कायम आहे. उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. मी सुद्धा त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे. महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवायला तयार आहे. यावर उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की, असलं तर मिटवायला वेळ लागणार नाही. फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की महाराष्ट्राच्या मुळावर येणारा जो आहे त्याच्यासोबत जाऊ नये.

2019 नंतर पहिल्यादांच सौदी अरेबीयाच्या दौऱ्यावर जाणार PM मोदी, नेमकं कारण काय? 

आमची 25 वर्षांची युती होते. काही काळ राज ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते. लोकसभा, विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये. महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे बाहेर जातात, ही सुद्धा भूमिका आहे. तेव्हा अशा शक्तींसोबत राहणं योग्य नाही. ती भूमिका आमची आज सुद्धा आहे. अशी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube