ब्रेकिंग : MPSC विद्यार्थांच्या सर्व मागण्या मान्य, पेपरफुटीबाबत फडणवीसांचे मोठे आश्वासन
MPSC Paper Leak राज्यसेवा मुख्य परिक्षा 2025 प्रकरणी मोठी अपडेट समोर. बैठकीमध्ये पेपर पुनर्तपासणी करण्याचे फडणवीस यांच्याकडून आश्वासन
MPSC Paper Leak Update : राज्यसेवा मुख्य परिक्षा 2025 प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून, मुख्य परिक्षेच्या पेपरची पुनर्तपासणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल आहे. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये फडणवीसांनी वरील आश्वासन दिले आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माध्यमांशी बोलताना दिली आहे. पेपरफुटीवर एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या निकालातील गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री यांच्यासोबत तब्बल पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिली. विशेष म्हणजे केवळ गुणांची फेरबेरीज किंवा पडताळणी न करता, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे पेपर पुन्हा तपासण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये दोन, सहा, 14 अशा मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली होती. मार्कमध्ये एवढी तफावत कशी असू शकते?” हा विद्यार्थ्यांचा प्रमुख प्रश्न होता. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला असून पेपरची फेरतपासणी करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
केवळ रिटोटलिंग नाही, पेपरच पुन्हा तपासणार
गुणांची केवळ बेरीज-वजाबाकी तपासणे म्हणजे रिटोटलिंग किंवा गुण पडताळणी. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यापुढे जाऊन संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पेपरची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सगळे संबंधित डिस्क्रिप्टिव्ह पेपर पुन्हा रिचेक केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं. दळवी समितीच्या अहवालानुसार पेपर तपासण्यात आले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्याने या संपूर्ण प्रक्रियेची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
21 सप्टेंबरपासूनच्या मुलाखती पुढे ढकलणार
पेपरच्या फेरतपासणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 21 सप्टेंबरपासून नियोजित असलेल्या मुलाखती पुढे ढकलण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यामुळे फेरतपासणीनंतरच पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. वैकल्पिक विषयाच्या पेपर-1 आणि पेपर-2 मधील गुणांमध्ये आढळणाऱ्या तफावतीचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी बैठकीत मांडला. दळवी समितीच्या अहवालानुसार गुणांचं नॉर्मलायझेशन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. हा मुद्दाही मुख्यमंत्र्यांनी मान्य केला असून आठ दिवसांत याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
डिस्क्रिप्टिव्ह पेपर RTI अंतर्गत मिळणार
RTI अंतर्गत विद्यार्थ्यांना पेपर उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. MATच्या निर्णयामुळे यापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर मिळत नसल्याचं शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. मात्र, यापुढे होणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षांचे पेपर RTI अंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
पेपर तपासणीतील गैरप्रकारांची SIT चौकशी
पेपर तपासणीसंदर्भातील आरोपांची SIT मार्फत चौकशी करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, तो कोणत्याही पदावर असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
‘आठ दिवसांत कारवाई नाही झाली तर पुन्हा आंदोलन करा’
सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांवर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करा, उपोषण करा; तो तुमचा अधिकार आहे. त्याला मी अडवणार नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सरकारकडून पुढील आठ दिवसांत प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
‘तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात’
एमपीएससी (MPSC) पेपरफुटीमुळे राज्यातील MPSC चे विद्यार्थी संतापले आहेत. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. “MPSC पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी राजीनामा देण्यास तयार आहे”, असे विवेक भीमनवार म्हणाले. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, भीमनवार यांचा राजीनामा जर घेतला नाही तर ते मुख्यमंत्र्यांचे खास मित्र आहेत, असा संदेश लोकांमध्ये जाईल, असेही रोहित पवार म्हणाले.
तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्षपदावर बसू शकतात. मी सगळं चेक केलं आहे. ज्या नियम व अटी आहेत. त्यानुसार तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे मुंढेंना MPSCआयोगाच्या अध्यक्षपद देण्यात यावं, अशी मागणी रोहित पवारांनी यावेळी केली. ज्याची आता चर्चा होत आहे.