Torres Company : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक
Torres Company CEO Arrested : टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई-पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्याला मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे. (Torres) त्यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद तौसिफ रियाज हाच या प्रकरणातील व्हिसलब्लोअर अर्थात प्रकरणाला वाचा फोडणारा व्यक्ती असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.
टोरेस प्रकरणातली आत्तापर्यंतची पाचवी अटक
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही अटकेची कारवाई केली आहे. मोहम्मद तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर हा या प्रकरणाला वाचा फोडणारा अर्थात व्हिसलब्लोअर असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. शनिवारी रात्री रियाजला पुण्याजवळून अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला आर्थिक गुन्हे शाखेनं दुजोरा दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे. रियाजला मुंबईत आणल्यानंतर रविवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कोण आहे मोहम्मद तौसिफ रियाज?
रियाज हा मूळचा बिहारमधील पाटण्याचा रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईजवळच्या विरारमध्ये वास्तव्यास होता. स्वत: रियाजनंच आपण व्हिसलब्लोअर असल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांना त्याचाही या प्रकरणात मोठा हात असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबाबत सखोल तपास केला. टोरेस घोटाळा उघड होणार असल्याची कुणकुण लागताच रियाजनं कंपनीचे सीए अभिषेक गुप्ता यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालाचा वापर करून गैरव्यवहार होत असल्याचं जाहीर केलं. त्यातून त्याला स्वत:चा गुन्हा लपवायचा होता, असं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.
काय आहे टोरेस घोटाळा प्रकरण?
गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरण चर्चेत आलं आहे. मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शोरूमच्या माध्यमातून टोरेस कंपनीनं हजारो नागरिकांची फसवणूक केली. आधी ४ टक्के, मग ६ टक्के आणि शेवटी ११ टक्के व्याज परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून लाखो-कोट्यवधींची गुंतवणूक करवून घेतली. त्यानंतर परताव्याची वेळ येताच अचानक कंपनीचे सर्व शोरूम बंद झाल्याचं गुंतवणूकदारांच्या निदर्शनास आलं आणि हा सगळा प्रकार उघड झाला.
आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे तपास विभागानं चार जणांना अटक केली आहे. त्यात हर्न कंपनीची जनरल मॅनेजर आणि उझबेकिस्तानची नागरिक तानिया झॅसोतोवा उर्फ तझागुल करासॅनोव्हा सॅसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे, स्टोअर इन-चार्ज वॅलेंटिना गणेश कुमार आणि संशयित हवाला ऑपरेटर अल्पशे खारा यांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आणखीन ८ युक्रेन व तुर्कियेचे नागरिक या प्रकरणात वाँटेड असून मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात इंटरपोल नोटीस जारी करवून घेण्यात यश आलं आहे.