नाना पटोले संतापले, डॉ. सुधीर तांबेंवर कारवाईची भाषा…

नाना पटोले संतापले, डॉ. सुधीर तांबेंवर कारवाईची भाषा…

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेसाठी दाखल केलेला अर्ज महाविकास आघाडीकडून अर्थात कॉंग्रेसच्यावतीने भरण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यासोबतच त्यांनी दुसरा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून भरलाय. तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटाकडून कोणताही उमेदवार देण्यात आला नाही. याउलट तांबे कुटुंबियांच्या या ड्राम्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून सत्यजित तांबे यांनी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

एकंदरीत या संपूर्ण घटेनवर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल माहिती घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडलीय. पटोले म्हणाले, कॉंग्रेसचे एकनिष्ठ असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यांचा मुलगा सत्यजित तांबेंकडून अपक्ष उमेदवारीचा अर्ज आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून उमेदवार न देणं, त्यासोबतच तांबेनी भाजपचा पाठिंबा मागणे हे सर्व पूर्वनियोजित असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच कॉंग्रेस पक्षाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची घोषणा देखील नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला असून आज हायकमांडकडून निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, बंडखोर आमदारांना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

भाजपकडून दुसऱ्यांची घरे फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आज हायकमांडच्या निर्देशानंतर पुढील कारवाईची पाऊल उचलली जाणार आहे. काहीही झालं तरी आम्ही तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अशोक चव्हाण म्हणाले :
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या जिल्ह्यात घडलेला हा प्रकार आहे. उमेदवारीबाबत जे काही घडलं, त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. त्या ठिकाणी काय वस्तुस्थिती होती हे आधी समजून घ्यायला हवं होतं. याबद्दल पक्षश्रेष्ठी गंभीर दखल घेतील.

दरम्यान, सुधीर तांबे कॉंग्रेस पक्षाशी दगाफटका करुन सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचा अर्ज भरला असून त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नसणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तांबेच्या विनंतीवरुन भाजप त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही बोललं जातंय.

भाजपला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी उमदेवार दिला नसल्याचंही बोललं जातंय. या संपूर्ण घटनेत तांबे कुटुंबियांनी कॉंग्रेसशी दगाफटका केल्याचं दिसून येतंय. येत्या 30 जानेवारीनंतर या मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार? सत्यजित तांबेंना भाजप मदत करणार का? भाजपमध्ये तांबे प्रवेश करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube