विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सरकारला महागात पडेल, फडणवीसांनी पक्ष फोडणं बंद करून….; पटोलेंनी सुनावलं
Nana Patole : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्य सरकार नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ खेळत आहे. भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परीक्षेचा (Talathi Exam) पेपर फुटल्याने लाखो तरुणांची निराशा झाली. परीक्षा घेणंही सरकारला जमत नाही, पेपर्स सातत्याने लीक होत आहेत. पण राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. तलाठी परीक्षेचे पेपर फुटीमागे जे लोक असतील, त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पध्दतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यातील तिन्ही पक्षांचे येडे सरकार नोकरभरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची क्रुर थट्टा करत आहे. या परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत घेतल्या जातात. राज्यभरातून 4466 तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले होते, यातून 1 अब्ज 4 कोटी 17 लाख रुपयांचे परीक्षा शुल्क घेतले. पण विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र दिले नाही. परीक्षेसाठी स्वत:च्या जिल्ह्यापासून दूरचे परीक्षा केंद्र दिले गेले. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परीक्षांना मुकले आहेत. एवढे करूनही या परीक्षेचा पेपर फुटला हे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचा प्रकार आहे.
इंफ्लुएंसर्सच्या फुकट आर्थिक सल्ल्यांवर बसणार लगाम, ASCI कडून नवीन नियमावली जारी
राज्यात यापूर्वी झालेल्या परिक्षांचे पेपर फुटण्याचा प्रश्न विधानसभेत पुराव्यासह उपस्थित केला असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीच्या खोट्या बातम्या आहेत, अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. या सरकारला भरती प्रक्रिया नीट करता येत नाही, दोषींना शिक्षा करण्याची मानसिकताही या सरकारची नाही. उलटपक्षी, पेपर फुटीच्या बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला जातो. हे अत्यंत आक्षेपार्ह आणि निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा प्रकार आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी पक्ष फोडणं बंद करून पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे. सरकारने भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवावे, अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यास सरकारला महागात पडेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्ष MPSC विद्यार्थ्यांसोबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. राज्य सेवांच्या धर्तीवर एकच कट ऑफ लावणे. MPSC मधील राज्यसेवा व संयुक्त परिक्षेच्या मुख्य परिक्षा ऑफलाईन घेणे, आयोगाची कर सहाय्यक आणि लिपिक पदांसाठी असणारी कौशल्य चाचणी ही GCC-TBC टायपिंग प्रमाणपत्राप्रमाणेच शब्द मर्यादा पाळून घ्यावी, जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत. सरळसेवेसाठीआकारले जाणारे 1000 रुपये शुल्क कमी करणे तसेच उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर पेपरफुटीविरोधात कायदा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व मागण्या योग्य असून त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचेही पटोले म्हणाले.