भुजबळ ‘कबड्डीपटू’, पटेल ‘फुटबॉलपटू’ तर, मुश्रीफ ‘कुस्तीपटू; तटकरेंनी दिलेल्या उपमांचे अर्थ काय?

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेली तीन नेत्यांची तुलना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

  • Written By: Published:
NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेली तीन नेत्यांची तुलना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. कारण तटकरेंनी छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि हसन मुश्रीफ या ज्येष्ठ नेत्यांचे वर्णन ‘क्रीडापटू’ म्हणून करत, आगामी काळात या नेत्यांच्या ‘रोल’वर शिक्कामोर्तब केले आहे. तटकरेंचे वरकरणी हे कौतुक वाटत असले तरी त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

भुजबळांना ‘कबड्डीपटू’ म्हणण्यामागचा संदेश

तटकरेंनी भुजबळ यांच्याबाबत केलेले वर्णन सर्वाधिक चर्चेत आहे. ज्यात तटकरे भुजबळांना खोलवर चढाई कशी करायची, बोनस गुण कसे मिळवायचे, कधी सातही जणांना बाद करून यायचे हे त्यांच्याशिवाय कुणालाच ठाऊक नाही,” असे म्हटले आहे. राजकीय भाषेत याचा अर्थ असा घेतला जात आहे की, भुजबळ हे पक्षातील सर्वाधिक अनुभवी आणि आक्रमक रणनीतीकार आहेत. ‘खोलवर चढाई’ आणि ‘सातही जणांना बाद करणे’ या शब्दांतून, विरोधकांवर तुटून पडण्याची भुजबळांची क्षमता आणि पक्षाला कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची त्यांची चतुराई तटकरेंनी अधोरेखित केली आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात ते पुन्हा सक्रीय झाले आहेत, हे सांगून त्यांना पक्षाने ‘फुल बॅक’ केले असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे “80 वर्षांचा तरुण खेळाडू” हा उल्लेख करून तटकरेंनी भुजबळांच्या सक्रियतेवर शिक्कामोर्तब केले. पक्षात नवीन पिढी आली असली तरी निवडणुकीच्या लढाईत अजूनही भुजबळ हे ‘मॅच विनर’ असल्याचा एकप्रकारे संदेश तटकरेंनी दिल्याचे मानले जात आहे.

सुनेत्रा पवारांचे हात बळकट करण्याचा उल्लेख का महत्त्वाचा?

तटकरेंनी भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे सांगताना “सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्यासाठी” हा उल्लेख केला. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आधीपासून आहे. अशा वेळी भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विधानातून दिसतो.

प्रफुल पटेलांना ‘फुटबॉलपटू’ म्हणण्याचा अर्थ काय?

प्रफुल पटेल यांचा उल्लेख करताना तटकरेंनी त्यांना फुटबॉलपटू असा केला आहे. फुटबॉलमध्ये ज्याप्रमाणे मैदानावर चपळ हालचाली कराव्या लागतात, तशीच भूमिका दिल्लीच्या राजकारणात प्रफुल पटेल बजावत आहेत. फुटबॉल हा समन्वय, पासिंग आणि संघभावनेचा खेळ मानला जातो. राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांशी संवाद साधण्याची क्षमता, आघाड्यांची जुळवाजुळव आणि पडद्यामागील राजकीय व्यवस्थापन यासाठी पटेल ओळखले जातात. म्हणूनच “फुटबॉलपटू” हे रूपक त्यांची राजकीय नेटवर्किंगची ताकद आणि संघाला योग्य दिशेने नेण्याची क्षमता अधोरेखित करणारे असल्याचे मानले जात आहे.

हसन मुश्रीफांना ‘कुस्तीपटू’ म्हणण्यामागील संकेत काय?

भाषणात तटकरेंनी हसन मुश्रीफ यांची तुलना कुस्तीपटूशी करत त्यांच्या संघर्षशील प्रतिमेवर भर दिल्याचे दिसते. कोल्हापूरच्या राजकारणात अनेक वर्षे विविध आव्हानांचा सामना करत मुश्रीफ यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवले आहे. चौकशी, आरोप-प्रत्यारोप आणि स्थानिक राजकीय संघर्षांमध्येही त्यांनी आपला प्रभाव कायम ठेवला. त्यामुळे त्यांना “कुस्तीपटू” म्हणणे म्हणजे कठीण परिस्थितीतही दोन हात करण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

अजित पवारांच्या टीमबाबतचा अप्रत्यक्ष संदेश

तटकरेंनी भुजबळ, पटेल आणि मुश्रीफ यांची तगडी टीम अजितदादांनी तयार केली आहे” असेही स्पष्टपणे सांगितले. दादांच्या नेतृत्वाखाली पक्षातील विविध वजनदार नेते एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न तटकरेंनी यातून केल्याचे दिसून येतो. कारण, पक्षात अनुभव, संघटन कौशल्य, रणनीती आणि संघर्ष करण्याची क्षमता असलेले नेते अजूनही एकत्र असल्याचे चित्र उभे करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

राजकीय संदेश नेमका काय?

तटकरेंच्या भाषणातील क्रीडा रूपके ही केवळ विनोदी किंवा कौतुकाची शैली नसून पक्षातील प्रत्येक ज्येष्ठ नेत्याची वेगळी राजकीय भूमिका अधोरेखित करणारी असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे तटकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिनी केलेले भाषण केवळ रूपकांचा खेळ नसून पक्षातील शक्तिकेंद्रे आणि नेतृत्वाची मांडणी करणारा महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे.

follow us