महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची शक्यता संपुष्टात; पुणे-चंद्रपूरचे बिगुल नव्या लोकसभेसोबतच वाजणार
पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (9 ऑक्टोबर) राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यावेळी आयोगाकडून नागालँडमधील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र पुणे आणि चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीची घोषणा केलेली नाही. (no by-elections in both Pune and Chandrapur Lok Sabha constituencies in Maharashtra)
पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्चला निधन झाले. त्यानंतर 30 मे रोजी चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधी कायदा 151 (ए) कलमानुसार लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक होणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. यापूर्वी निवडणूक आयोगाने विविध राज्यातील विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्याही वेळी पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक घोषित झाली नव्हती. त्यानंतर यावेळीही पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.
Pune : मुक्तांगण शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण; मनसे कार्यकर्त्यांनी आणला प्रकार उघडकीस
निवडणूक टाळण्यासाठी दोन अपवाद :
पोटनिवडणूक टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात दोन अपवादांची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभा अथवा संबंधित राज्यातील विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेतली जात नाही. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराईमुळे सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यास पोटनिवडणूक घेण्यास सूट दिली जाते.
खेडो-पाडी पक्ष रुजवणारा ठाकरेंचा शिलेदार हरपला; शिवसेनेचे जिल्हा संघटक अविनाश रहाणेंचे निधन
दरम्यान, विद्यमान 17 व्या लोकसभेची मुदत 17 जून 2024 रोजी संपत आहे. म्हणजेच पुण्याची जागा रिक्त झाल्यापासून 15 महिन्यांचा तर चंद्रपूरची जागा रिक्त झाल्यानंतर 13 महिन्यांचा लोकसभेचा अवधी शिल्लक होता. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दोन्ही मतदारसंघांमध्ये लागू पडत नाही. पण त्यानंतरही पोटनिवडणूक जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या दोन्ही पोटनिवडणुका नेमक्या कोणत्या मुद्द्याच्या आधारे घोषित करण्यात आल्या नाहीत असाही सवाल विचारला जात आहे.
अवघ्या 12 दिवसांसाठी घेतली होती निवडणूक :
यापूर्वी 2018 मध्ये कर्नाटकातील तीन लोकसभा मतदारसंघ विविध कारणांमुळे रिक्त झाले होते. यावेळी लोकसभेची मुदत संपण्यासाठी एक वर्षे, 12 दिवस मुदत शिल्लक होती. पण त्यानंतरही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.