खेडो-पाडी पक्ष रुजवणारा ठाकरेंचा शिलेदार हरपला; शिवसेनेचे जिल्हा संघटक अविनाश रहाणेंचे निधन

खेडो-पाडी पक्ष रुजवणारा ठाकरेंचा शिलेदार हरपला; शिवसेनेचे जिल्हा संघटक अविनाश रहाणेंचे निधन

पुणे : आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक अविनाश रहाणे (Avinash Rahane) यांचे आज (8 ऑक्टोबर) निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींमुळे त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena (UBT) district organizer Avinash Rahane passed away)

अविनाश रहाणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन 40 वर्षांपूर्वी शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक अशा विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी काम केले. या दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले. रहाणे यांच्या नेतृत्वात आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने चांगली कामगरी केली होती.

Road Accident : भीषण अपघात! मिनी बस 60 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू

रहाणे यांच्या या कार्यामुळे पक्षाने त्यांना थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात दोनदा मैदानात उतरविले. 1999 आणि 2004 अशी दोनवेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेत आणण्यात आणि त्यांच्या विजयाला मदत करण्यात रहाणे यांचा मोठा वाटा होता. 2004 साली पराभवानंतर त्यांनी काही दिवस राष्ट्रवादी पक्षात काम केले, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तिथेही ते फार काळ रमले नाहीत आणि ते स्वगृही परतले.

Rohit Pawar : ‘अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण, सावंत’.. रोहित पवार असं का म्हणाले?

मागील काही काळापासून ते प्रकृती अस्वस्थामुळे राजकारणापासून दूर होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते पक्षात पुन्हा सक्रिय झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी नुकतेच आपण शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. दिलीप वळसे पाटील यांना आपण दोनवेळा जेरीस आणले होते, आता बंडखोरी करणाऱ्या आढळराव पाटील यांना आव्हान देणार असल्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला होता.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले. मंचर येथील शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. काही काळ त्यांनी दैनिक सामना आणि साप्ताहिक बोभाटाच्या माध्यमातून पत्रकारिता केली. या काळात त्यांनी युवा पत्रकारांनाही घडविण्याचे काम केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज