पाण्याचा थेंब किती दूषित? जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी तपासणी; FTK देणार झटपट रिपोर्ट

पाण्याचा थेंब किती दूषित? जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी तपासणी; FTK देणार झटपट रिपोर्ट

Ahilyanagar News : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी 7 जूनपर्यंत क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे (एफटीके) पाणी गुणवत्ता तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व 1575 गावांत ही मोहीम राबवून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. या काळात दुषित पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे.

जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता तपासणी मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, सुभाष सातपुते, दादाभाऊ गुंजाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे तसेच सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.

पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावपातळीवर एफटीके संचाद्वारे रासायनिक व जैविक तपासणीसह जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये गावांमध्ये पाणी तपासणीसाठी निवडलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी, प्रशिक्षण नोंदी, तसेच आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना एफटीके किटद्वारे प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यांतील पाण्याचे नमुने तपासले जातील. संबंधित माहिती ‘डब्ल्यूक्यूएमआयएस’ पोर्टलवर नोंदविली जाईल.

मेडिकल कॉलेजचं क्रेडिट वॉर, विखे-लंके वादाची वात पेटली; नगरच्या राजकारणात काय घडतंय?

दीड हजार गावांतील पाणी तपासणार

नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाड्या व घरगुती नळ जोडण्यांची तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफटीके संचांचे वाटप करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना पाणी गुणवत्ता तपासणीचे महत्त्व व त्याचे फायदे सांगण्यात येणार आहेत. या मोहीमेची जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत पातळीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल. या संपूर्ण कालावधीत 1575 गावांमध्ये एफटीकेद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी दिली.

काय आहे एफटीके

एफटीके (Field Testing Kit) हा एक पोर्टेबल तपासणी संच आहे. या किटद्वारे पिण्याच्या पाण्यातील पीएच पातळी, क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कॉलिनिटी, गढूळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणाची तात्काळ तपासणी करता येते. यामुळे गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखता येते व आवश्यक उपाययोजना शक्य होते.

पावसाळा येतोय, मुख्यालय सोडू नका! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अन् अधिकारी कर्मचाऱ्यांना कामांची यादी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube