अहिल्यानगर शहरात स्त्रीमुक्तीचा गजर! पन्नास वर्षांच्या चळवळीचा आढावा, प्रेरक विचारांची मेजवानी

महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सीएसआरडी संस्थेच्या वतीने आयोजित या विशेष परिषदेच्या माध्यमातून स्त्रीचळवळीच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला.

Ahilyanagar News (1)

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात स्त्रीमुक्तीचा गजर झंकारला. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सीएसआरडी संस्थेच्या वतीने आयोजित या विशेष परिषदेच्या माध्यमातून स्त्रीचळवळीच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. संविधानिक मूल्यांवर आधारित समता आणि भगिनीभावाचा संदेश देत महिलांनी परिवर्तनाच्या नव्या वाटा दाखवल्या. काल 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सीएसआरडी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त आयोजित महिला परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनिषा गुप्ते यांनी गेल्या पन्नास वर्षातील स्त्रियांच्या चळवळीचा आढावा घेतला.

स्त्रीजीवनात मोठे परिवर्तन

स्त्रियांच्या चळवळीमुळे स्त्रीजीवनात मोठे परिवर्तन झाले (Ahilyanagar News) आहे. हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी स्त्री पुरुष समतेच्या मूल्यावर विश्वास ठेवून संविधानाच्या आधारावर काम करायला हवे, असे मनिषा गुप्ते यांनी भाषणात सांगितले. परिषदेचे उद्घाटन सीएसआरडी प्राचार्य सुरेश पठारे यांनी केले. स्त्रियांच्या चळवळीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे नेत काम केले आहे असे सांगून त्यांनी परिषदेला (Maharashtra Strimukti Parishad) शुभेच्छा दिल्या.

धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर विश्वास

अहिल्यानगर येथील पोलिस भरोसा विभागाच्या प्रमुख प्रियंका आठरे यांनी भरोसा सेल च्या कामाविषयी माहिती दिली. सर्व धर्मीय समाजाच्या एकात्मतेच्या वातावरणातच स्त्रियांच्या चळवळीला सामर्थ्य मिळते. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर विश्वास ठेवत स्त्रियांमधील भगिनीभाव वाढवणे हे चळवळीचे कार्य आहे, असे परिषदेच्या अध्यक्ष ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या साथी ॲड निशा शिवूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

परिषदेच्या प्रास्ताविकात नीलिमा जाधव बंडेलू यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील चळवळींच्या वारसा आपण पुढे न्यायला हवा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या कॉ. लता भिसे यांनी महाराष्ट स्त्रीमुक्ती परिषदेची वाटचाल, विविध मोहिमांविषयी भाषणात सांगितले. एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन स्त्री चळवळीला कार्य करायचे आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

हिंसेविरोधात एकत्र काम

डॉ. रमेश अवस्थी आणि कॉ. स्मिता पानसरे यांनी हिंसेच्या विविध पैलूंवर उपस्थित प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणली. सर्व प्रकारच्या हिंसेविरोधात एकत्र काम करण्याची गरज या चर्चेत सहभागींनी व्यक्त केली. ॲड. निर्मला चौधरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींच्या प्रश्नाची मांडणी केली. शाहीर प्रवीण सोनवणे आणि साथींनी चळवळींची विविध गाणी सादर केली. संध्या मेढे यांनी आभार मानले. परिषदेच्या यशस्वितेसाठी संध्या मेढे, ॲड निर्मला चौधरी, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, भैरवनाथ वाकळे, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे,सुरेखा आडम, बेबीताई जाधव शांताराम गोसावी,मंगला भावसार ,सरोज आल्हाट, स्मिता पानसरे इत्यादींनी प्रयत्न केले.परिषदेला स्त्री पुरुष प्रतिनिधींची मोठी संख्या होती.

follow us