“हा तर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव”, मनपा प्रभाग रचनेवर खा. लंकेंनी घेतली हरकत

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी हरकत घेतली आहे.

Nilesh Lanke

Nilesh Lanke News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांनी हरकत घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या निवेदनानंतर नगर शहराच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.

निलेश लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की नव्या (Nilesh Lanke) प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम 16, 243 (टी), 243 (एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 5(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे. खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्यातिकड्या रेषा मारून गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.

“आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा”, सुजय विखेंचा निलेश लंकेंना खोचक टोला

सन 2018 च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला. नगर विकास विभागाच्या 10 जून 2025 च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा-मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे. त्यामुळे 2018 प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.

“राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा दावा खासदार लंके यांनी या निवेदनाद्वारे केला आहे. त्यांच्या या निवेदनानंतर नगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता या निवेदनावर प्रशासन काय निर्णय घेणार? लंके यांची मागणी मान्य करून  प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“महामार्ग रुंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करा” खासदार निलेश लंके बसले उपोषणाला 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube