“जयजयकार करू अहिल्यादेवींचा..” अहिल्यानगर गौरव गीताचे उत्साहात लोकार्पण

Ahilyanagar News : ‘अहिल्यानगर गौरव गीताचे’ शहरातील माऊली सभागृहात आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. विचार भारतीच्या संकल्पनेतून व गौतम मुनोत प्रोडक्शन निर्मित ‘जयजयकार करू अहिल्यादेवींचा.. जयजयकार करू अहिल्यानगरीचा.. गौरवगीत दाखवण्यात आले. उपस्थित नगरकरांनी टाळ्यांचा कडकडाट करत उभे राहून भारतमातेचा व अहिल्यादेवींचा जयघोष करत गीताला मानवंदना दिली. विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, निर्माते गौतम मुनोत, गीतकार संजय धोत्रे, संगीत संयोजक डॉ. निरज करंदीकर, श्रीमती मुनोत व प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रशांत पोळ आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचं नामांतर झाल्याने नागरिकांत अभिमानाची भावना आहे. नाव बदललं तसा आता शहर आणि जिल्ह्याचा विकास वेगात सुरू आहे. विचार भारतीच्या उपक्रमांतून समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले जाते. अहिल्यानगर गौरव गीत सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. गौरवगीताचे निर्माते गौतम मुनोत यांनीही मनोगत व्यक्त केले. शंभर टक्के नगरचेच असलेल्या या गाण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. आता नगरकरांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांच्याकडून गाणं जास्तीत जास्त शेअर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. नीरज करंदीकर, गीतकार संजय धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
“लाठीकाठीचं प्रशिक्षण गरजेचं, चांगले प्रशिक्षकही तयार व्हावेत” : नरेंद्र फिरोदिया
रवींद्र मुळे म्हणाले, नगरच्या नामांतरासाठी विचार भारतीने ध्यास घेतला होता. जिल्ह्याचा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढीला समजावा, अहिल्यानगरी बद्दल सर्वांना अभिमान वाटावा यासाठी खास गौरव गीताची निर्मिती केली आहे. हे गीत सर्व शाळांमध्ये रोज ऐकले जावे. शासकीय कार्यक्रमात देखील या गीताचे गायन व्हावे आणि त्यातून उज्वल नव्या पिढी निर्माण व्हावी यासाठी विचार भारती प्रयत्नशील आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज मुनोत यांनी केले.
अहिल्यानगर गौरव गीताची संकल्पना विचार भारती, निर्माता गौतम मुनोत, गीतकार संजय धोत्रे, गायक रोहित राऊत व अपूर्वा निषाद, संगीतकार डॉ. नीरज करंदीकर, कोरस अजित विसपुते, अमृता बेडेकर, ऋतुजा पाठक, श्रेया सुवर्णपाठकी, दीप्ती करंदीकर, चैतन्य जोग. व्हिडिओ एडिटर प्रथमेश बर्डे. निर्मिती पश्चात विराज मुनोत व प्रशांत जठार यांची आहे.