नगरचे पाणी महागले! महापालिकेकडून पाणीपट्टीत मोठी वाढ; आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्णय

Ahilyanagar News : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आज १ एप्रिलपासून घरगुती नळ कनेक्शन धारकांना १५०० ऐवजी २४०० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. महापालिकेने पाणीपट्टी वाढवली असली तरी नगरकरांना मिळणाऱ्या पाण्यात मात्र वाढ झालेली नाही. दरम्यान या करवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असून मनपाच्या उत्पन्नात ६.१४ कोटींनी वाढ होणार आहे.
आर्थिक भुर्दंड! पाणीपट्टी वाढली पाणी नाही…
आजपासून नगरकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ झाली आहे. मात्र नागरिकांना रोज पाणी मिळणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत शहरात सन २०११-१२ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या पाणी उपशात सुमारे ३० कोटी लीटरने वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही रोज पाणीपुरवठा केला जात नाही. विशेषतः कल्याण रोड परिसरात काही ठिकाणी तीन दिवसांनी तर काही भागात पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
Ahilyanagar : ठाकरे गटाचा कॉंग्रेसला धक्का, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी हाती घेतली मशाल
केडगाव परिसरात तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढली तरी पाणी मात्र वाढलेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुळा धरणातून सध्या १०० ते १०५ एमएलडी पाणी उपसले जाते. शहराच्या सध्याच्या लोकसंख्येला यातून रोज पाणी देता येऊ शकते. मात्र, शहराच्या कोणत्या भागात किती लोकसंख्या आहे? तिथे किती पाण्याची गरज आहे? कोणत्या भागात किती पाणी सोडले जाते? याचे नियोजन मनपाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अद्यापही वितरणाचे नियोजन करण्यात आलेले नाही.
तब्बल २२ वर्षांनंतर मनपाने पहिल्यांदा पाणीपट्टी वाढवली आहे. पाणीपट्टी वाढवूनही उत्पन्न व पाणी योजनेचा खर्च यातील तफावत मोठी आहे. पाण्याचा उपसा काही प्रमाणात वाढला असला तरी मागणीही तेवढीच वाढलेली आहे. काही उपनगरात अद्यापही वितरण व्यवस्थेची कामे बाकी आहेत. त्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाल्यानंतर रोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येईल अशी माहिती मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.
नगरमध्ये लवकरच सरकारी मेडिकल कॉलेज, केंद्राकडून समिती नियुक्त; खा. लंकेंचा पाठपुरावा