अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले

Ahilyanagar : भगवान बाबा चौक परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. सं

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ahilyanagar

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौक परिसरात एका 35 वर्षीय महिलेवर तरूणाने घरात घुसून गोळीबार केला. त्यात महिला जखमी झाली. गोळीबारानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय. योगेश सोमनाथ डोंगरे असे मृत तरूणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली.

भगवान बाबा चौक परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला आणि तरुण एकमेकांच्या परिचयाचे होते. दोघे फ्लॅटमध्ये असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. गोळीबारात महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. टिपरसे यांनी दिली.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर तरूण घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, काही वेळानंतर कापूरवाडी परिसरात त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती कळतात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. महिला आणि तरूण यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना प्रेमसंबंधांतून घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

follow us