नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’
Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पारंपरिक मिरवणूक मार्गावरून जनसंवाद यात्रा जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रा सुरू होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, क्रांतीसूर्य महात्मा फुले पुतळ्याला अभिवादन करून शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले जाईल.
Subhedar: सुभेदार सिनेमा पाहिल्यावर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘खरे हिरो…’
त्यानंतर आशा टॉकीज, माणिक चौक, एमजी रोड, तेली खुंट, नेता सुभाष चौक मार्गे यात्रेचा समारोप शहर काँग्रेसच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयासमोर जनसंवाद सभेने होणार आहे. यात्रा शुभारंभाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले जाणार आहे. यात्रेदरम्यान बाळासाहेब थोरात हे व्यापारी, छोटे व्यावसायिक, कष्टकरी, भाजीवाले, नागरिक यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत.
राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते कश्मीर या सुमारे 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. या वर्षपूर्तीचा आनंदोत्सव देखील यावेळी शहर काँग्रेस साजरा करणार आहे.
नगर दक्षिण लोकसभा, नगर शहर विधानसभा मतदार संघाच्या जागेवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. लोकसभेला बाळासाहेब थोरात यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांनी श्रेष्ठींकडे जोरदार मागणी केली आहे.
त्यातच शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून ऐतिहासिक पारंपरिक मार्गावरून शहर काँग्रेसने यात्रा आणि सभेचे आयोजन केल्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांसह नगरकरांचे लक्ष याकडे लागले आहे.