“थोरातांना उमेदवारी द्या, पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उडवू”
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे (Congress) घ्यावा, हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधी देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक आणि माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासमोरच लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला. (Ahmednagar Lok Sabha Constituency should be given to Congress in any case and Balasaheb Thorat should be nominated)
काँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघातील काँग्रेसची ताकद, कार्यकर्त्यांची भावना, मतदारसंघातील स्थानिक पाातळीवरील राजकारण, मित्र पक्षांची ताकद आणि उमेदवाराची चाचपणी अशी सर्व गोष्टींचा आढावा घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यात अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून चंद्रकांत हांडोरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक शहरात पार पडली.
चंद्रकांत हांडोरे काय म्हणाले?
कार्यकर्त्यांच्या दाव्यानंतर चंद्रकांत हांडोरेंकडे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना मी कोअर कमिटी समोर मांडणार आहे. दक्षिणेची जागा काँग्रेसने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राज्याचे नेते आणि माझे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरू. त्यासाठी मित्र पक्षांशी ही आम्ही चर्चा करू. त्यांना समजावून सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?
बाळासाहेब थोरातांना उमेदवारी द्या :
यावेळी कार्यकर्त्यांनी जागा काँग्रेसकडे घेण्यासोबतच इथून बाळासाहेब थोरातांना उमेदवारी द्यावी अशीही मागणी केली. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे म्हणाले, ही काँग्रेसची सुवर्णभूमी आहे. ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले त्यांनीच ताटात छेद केला. जिल्ह्यातील काँग्रेस थोरातांनी सांभाळली. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षाने लढवाव्यात.
विखे पिता – पुत्रांचे दक्षिणेतील दहशतीचे झाकण उडवू
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी चमत्कार घडवून दाखवला. विखे पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उडविले. काँग्रेसने अहमदनगर लोकसभेची जागा घेऊन थोरातांना उमेदवार दिल्यास शहरातील आमदारांच्या दहशतीसह विखेंचेही प्रशासनाच्या दुरुपयोगाच्या माध्यमातून असणारे दहशतीचे झाकण मतदारांच्या मदतीने काँग्रेस कार्यकर्ते कायमचे उडवतील, असा हल्लाबोल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.
भावाला ईडीची नोटीस, 6 निकटवर्तीय रडारवर; जयंत पाटीलही सोडणार साथ? शरद पवारांचा मोठा दावा
ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, दक्षिणची जागा काँग्रेस नक्की जिंकेल. थोरातांची सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची प्रतिमा, महाविकास आघाडीला असणारे समर्थन यामुळे विजय खेचून आणता येईल. तर राज्य काँग्रेसचे सहसचिव वीरेंद्र किराड म्हणाले, शहरासह जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट करायची आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांनी आत्ता पासूनच सुरू करावी.
अहमदनगर शहराच्या जागेवर ही दावा :
मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी यावेळी लोकसभेला बाळासाहेब थोरात तर विधानसभेला शहरातून किरण काळेंना उमेदवार करण्याची जोरदार मागणी करत शहराच्याही जागेवर दावा केला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे भाजपबरोबर गेले आहेत. यापूर्वी थोरातांनी स्वतःच किरण काळे शहराचे आमदार होतील असे जाहीर भाष्य केले आहे. थोरात यांची भविष्यवाणी नगरकर खरी करून दाखवतील, असा विश्वासही यावेळी कार्यकर्त्यांनी निरीक्षक हंडोरे यांच्यासमोर व्यक्त केला.