मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण…
सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे (Nagar) गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग, तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या.यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थितीत होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
खासदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच तरी नगर मनमाड रस्त्यासाठी प्राजक्त तनपुरे रस्त्यावर
आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली. वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन” असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले.
सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले.
