खानदेशचा बुलंद ‘आवाज’ हरपला! माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

खानदेशचा बुलंद ‘आवाज’ हरपला! माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

Gulabrao Patil Passed Away : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार तथा समाजवादी विचारसरणीचे नेते गुलाबराव पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या मूळगावी दहिवद (ता. अमळनेर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाटील यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

असा होता राजकीय प्रवास

गुलाबराव पाटील सर्वात आधी 1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये निवडून आले होते. त्यानंतर पुढील अडीच वर्षातच हे सरकार बरखास्त झाले. सन 1980 मध्ये पाटील पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. 1985 मध्ये अमृतराव पाटील यांच्याकडून मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 1990 ते 95 दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. तीन वेळा एकूण 13 वर्षे जनता दलाचे आमदार होते.

प्रखर वक्ता ते निर्भीड राजकारणी

गुलाबराव पाटील यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे अशा त्यांच्या भूमिका त्याकाळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांनी साथी संदेश हे वृत्तपत्रही काढले होते. त्यांची निर्भीड पत्रकारिताही चांगलीच गाजली होती. त्यांचा वकृत्वाचा प्रभावही विलक्षण असाच होता. जाहीर सभेत मध्यंतर घेऊन पुन्हा सभा घेणारे आचार्य अत्रे यांच्यानंतर गुलाबराव पाटील एकमेव होते.

अजितदादा अन् शिंदे सत्तेत का गेले? चव्हाणांनी सांगितलं आतलं राजकारण

अमळनेर मध्ये चांगली शाळा असावी या उदात्त हेतूने त्यांनी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. साने गुरुजींच्या नावाने शाळा सुरू केल्या. एखाद्याच्या गोटात जाऊन माहिती काढून तो मुद्दा ते थेट विधानसभेत मांडत असत. इतकेच नाही तर त्याकाळात त्यांनी शरद पवार, शंकरराव चव्हाण, भाई ठाकूर, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवरही कडाडून टीका केली होती.

अहिराणी भाषेतून शपथ घेणारे पहिले आमदार

समाजवादी विचारसरणीचे नेते म्हणून ते ओळखले जात होते. विधानसभेत अहिराणी भाषेतून शपथ घेणारे ते पहिले आमदार होते. खानदेशची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही त्यांची ओळख होती. पाटील तीन वेळा जनता दलाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आपल्या राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube