‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला
Devendra Fadnavis replies Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेवर तितक्याच तडफेने उत्तर दिले. फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केलेल्य टीकेचा चांगलाच समाचार घेतला.
किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील असं मला वाटत होतं. पण, त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि विरोधाला विरोध करायचा आहे अशांना उत्तरे देऊन तरी काय फायदा असा टोला फडणवीस यांनी लगावला.
‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
“नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? “पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत? उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!” असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतील निवेदनाचा व्हिडीओ भाजपने ट्विटरवर शेअर केला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तुम्हाला अत्यानंद झाला असेल की तुम्ही आपल्या कोकणातल्या नाणार प्रकल्पाला विरोध करुन पाकिस्तानच्या ढासळत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला, अशी टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.