नगर-मनमाड रस्त्यासाठी मंत्रालयात बैठक; ठेकेदाराला सुचना : विखे-पाटलांनी दिली नवी डेडलाईन

नगर-मनमाड रस्त्यासाठी मंत्रालयात बैठक; ठेकेदाराला सुचना : विखे-पाटलांनी दिली नवी डेडलाईन

Ahmednagar-Manmad Highway : अहमदनगर : जिल्हयातील अहमदनगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना दिले. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित ठेकेदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार (26 सप्टेंबर) मुंबई मंत्रालय येथे महत्त्वाची बैठक पार पडली, यावेळी या सुचना देण्यात आल्या. (meeting was held for Ahmednagar-Manmad road and Radhakrishna Vikhe-Patal gave a new deadline for the completion of work)

या बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महासंचालक (रस्ते) आणि प्रकल्प संचालक डी. एस. झोडगे, साईट अभियंता दिग्विजय पाटणकर, साईट अभियंता ओ.जी. अनेराव, ऑथोरिटी इंजिनिअर महेश मिश्रा, बी.पी.सी.एलचे मनोज शिंगोटे, रुद्रानी इन्फ्राचे विवेक देशपांडे मनिषा कन्स्ट्रक्शनचे जी.एल.माने यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत काय झाले?

या बैठकीबाबत माहिती देताना सुजय विखे पाटील म्हणाले, या बैठकीमध्ये अहमदनगर-मनमाड रस्त्याला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून झालेल्या कामाची दिरंगाई आणि विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान पुढच्या पंधरा दिवसांमध्ये अतिरिक्त 15 कोटी रुपये या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्वरित मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे टेंडर होऊन पंधरा दिवसांमध्ये रस्ता मोटरेबल करण्याचे आदेश देखील देण्यात आले. तसेच पुढच्या 15 दिवसांमध्ये नेमलेला ठेकेदार रुद्रानी अँड मनिषा इन्फ्रा या कंपनीने संपूर्ण रस्त्याचे काम त्वरित सुरू करावं अशा सूचना करून त्यांना येणाऱ्या गौण खनिजाच्या अडचणी संदर्भात देखील चर्चा या बैठकीत केली.

शिवाय एचपीसीएल गॅस पाईप लाईनचे अधिकारी व ठेकेदारांसोबतही बैठक आयोजित करून ज्या ज्या ठिकाणी पाईप टाकताना रस्ता खराब झाला आहे, तो रस्ता देखील त्वरित दुरूस्त करून द्यावा आणि कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून सावधानी बाळगावी. तसेच पुढच्या 6 ते 7 महिन्यांमध्ये हा रस्ता पूर्णपणे दोन्हीही बाजूंनी मोटरेबल होईल अशा प्रकारची सकारात्मक चर्चा बैठकीत झाली. यासोबतच पावसामध्ये क्रेनची सुविधा, अपघात न होण्याच्या दृष्टिकोनातून बॅरियर्स लावण्याच्या सूचना दिल्या असून बहुप्रतिक्षित असलेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा असे आदेश दिले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग १६०( नगर – मनमाड) वरील सावळी विहीर ते नगर बायपास विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र कंत्राटदारांच्या काम दिरंगाईमुळे सदर रस्त्यांचे काम रेंगाळले होते. त्यातच गॅस वाहिन्यांसाठी खोदकाम करून तेथील रस्त्यावर माती आल्याने दुहेरी वाहतुकीचा रस्ता केवळ एकल मार्ग झाला आहे. वाहतूक कोंडी आणि अतिशय संथगतीने सुरू असलेल्या वाहतूकीमुळे जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बैठकीत याविषयी सखोल चर्चा झाली आणि येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील असे विखे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube