शेवगाव परिषदेतील राजकारण पेटले; नगराध्यक्षा व नगरसेवकांचे एकमेंकावर गंभीर आरोप; थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी
Maya Munde : आपल्या पक्षाचे संख्याबळ कमी असल्याचा गैरफायदा घेत काही नगरसेवक टोळी बनवून बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकत आहेत.
अहिल्यानगर: शेवगाव नगरपरिषदेतील (shegaon Nagarparishad) राजकीय वातावरण भयंकर तापले आहे. नगराध्यक्षा आणि नगरसेवकांमधील अंतर्गत वाद आता उघड्यावर आला आहे. आम्ही सांगू तसंच काम करा, अन्यथा पदावरून घालवून टाकू, अशा उघड धमक्या देत काही नगरसेवक आणि महिला नगरसेवकांचे पती बेकायदेशीर कामांसाठी दबाव आणत असल्याचा खळबळजनक आरोप लोकनियुक्त नगराध्यक्षा माया अरुण मुंढे (Maya Munde) यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. या आरोपांमुळे शेवगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तेरा नगरसेवकांची कोणती तक्रार ?
नगराध्यक्षा माया मुंढे आणि त्यांचे पती अरुण मुंढेविरोधात तेरा नगरसेवकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. नगराध्यक्षांच्या पतींकडून नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभारात अनधिकृत हस्तक्षेप करून नगरपरिषदेचा कारभार चालविणे, नगराध्यक्षांच्या दालनातून अधिकार व कर्मचाऱ्यांना आदेश देणे, नगरपरिषदेची फाइल घरी मागवून घेणे, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर दबाव आणणे, तसेच सर्वसाधारण सभेच्या दिवशी नगरसेवकांना धमकाविण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केलीय आहे. सिराजुद्दीन पटेल, वजीर पठाण, कैलास तिजोरी, सुनील काकडे, अमर पुरनाळे, संतोष जाधव, सुवर्णा मगरे, तृषा भारस्करत सलमाबी कुरेशी, शिवानी काथवटे, आशुतोष डहाळे, साधना लांडे, साईनाथ आधार या नगरसेवकांनी तक्रार केलीय.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगराध्यक्षा माया मुंढे यांनी दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेतील भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आपल्या पक्षाचे संख्याबळ कमी असल्याचा गैरफायदा घेत काही नगरसेवक टोळी बनवून बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकत आहेत. निवडणुकीत झालेला अफाट खर्च वसूल करण्यासाठी काही नगरसेवक सर्वसामान्य जनतेच्या निधीवर दरोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. विकासकामांचा निधी सर्व प्रभागांत समान वाटण्याची भूमिका घेतल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असून, आपली आणि पतीची बदनामी करण्यासाठी खोट्या तक्रारी रचल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या.
उपनगराध्यक्षाच्या पुत्राकडून बेकायदेशीर कारभार; नगराध्यक्षांचा आरोप
इतकेच नव्हे तर, महिला नगरसेवकांचे पती नगरपरिषदेत घुसून कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत बेकायदेशीर कामे उरकून घेत असल्याचा संतापजनक प्रकारही त्यांनी उघडकीस आणला. उपनगराध्यक्ष सिराजभाई पटेल यांचे पुत्र ताहेरभाई पटेल हे स्वतः उपनगराध्यक्ष असल्याचा आव आणत उपनगराध्यक्षांच्या दालनात बसून बेकायदेशीर कारभार हाकत असल्याचा धक्कादायक दावा नगराध्यक्षांनी
केला आहे.
पत्नीच्या कामात हस्तक्षेप करत नसून केवळ मार्गदर्शन: अरुण मुंढे
या संपूर्ण प्रकरणावर नगराध्यक्षांचे पती अरुण मुंढे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारा नगरसेवकांच्या वैयक्तिक आर्थिक हितसंबंधांना चाट पडल्यामुळेच हा धुरळा उडाला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. आपण पत्नीच्या कामात हस्तक्षेप करत नसून केवळ मार्गदर्शन करत आहोत आणि मार्गदर्शनाला कुणी गैर मानत असेल तर न्यायालयात खेचू, असा थेट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे. दुसरीकडे या गंभीर आरोपांनंतर विरोधकांनी काढता पाय घेतला असून, प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नगराध्यक्षांच्या या सनसनाटी निवेदनामुळे नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा आरोप उघडा पडली असून, आता जिल्हाधिकारी प्रशासन या बेकायदेशीर कामांवर आणि धमक्या देणाऱ्या नगरसेवकांवर काय कडक कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.