Shirdi : मोठी बातमी! पास असेल तरच मिळेल साईबाबांचे दर्शन; न्यायालयाचे आदेश काय?
Shirdi News : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. शिर्डीत (Shirdi) रोज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की दर्शन पास असल्याशिवाय साईबाबांचे दर्शन घेता येणार नाही. आदेशात न्यायालयाने पुढे म्हटले आहे की पासेसची खात्री करूनच मंदिरात प्रवेश देण्यात यावा. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचं आहे त्यांची ऑनलाइन नोंद घ्यावी आणि फक्त त्यांनाच दर्शनाचा पास दिला जाईल याची काळजी घेण्यात यावी. या व्यतिरिक्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आधारकार्डची पडताळणी करून त्याचा नंबर विशेष आणि व्हीआयपी दर्शन पासवर नोंदवावा.
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी साईबाबांच्या चरणी लीन! निळवंडेच्या डाव्या कालव्याचे जलपूजन
अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीशांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालातील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षेत बदल न करता सुरक्षाव्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल असे निर्देश न्यायालयाने दिले. मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही. न्यायालयाच्या या आदेशाची अंमसबजावणी करणे बंधनकारक आहे अन्यथा हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंदिर आणि परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात याचिका दाखल केली होती. मंदिराची आणि येथील परिसराची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलीस बल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामार्फत करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासाठी पाठपुरावाही करण्यात आला होता.