Health Department Recruitment : भरतीची विचारणा केल्याने अधिकाऱ्याचं अर्वाच्च भाषेत उत्तर
Health Department Recruitment : राज्य आरोग्य विभाग भरतीच्या जाहिरातीबाबत विद्यार्थी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नसल्याचं एका महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य भरतीच्या परिक्षार्थीला सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या संभाषणात बोलणारी एक महिला आरोग्य अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. या संभाषणामध्ये महिला अधिकाऱ्याकडून अर्वाच्च भाषेत उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. महिला आरोग्य अधिकारी मंत्रालयातून बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये एका उमेदवाराकडून जाहिरात कधी येणार असल्याचं विचारण्यात आल्यानंतर असं फोन करुन विचारायचं नाही. वेबसाईटला तपासायचं, तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नाही, असं अर्वाच्च भाषेत महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर उमेदवार आणि या महिला अधिकाऱ्याचा फोनवर चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालंय.
Maharashtra Politics : फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंची धडपड; केसरकरांचा आरोप
त्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने सांगितलं की, आरोग्य खात्याच्या मंत्र्यांना सांगून लवकरात लवकर भरती काढावी, या आधी झालेल्या भरतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांमुळे पेपर फुटला असल्याचा आरोप विद्यार्थ्याकडून करण्यात आला. त्यानंतर पेपर फोडायला कोण गेलं होतं? असा सवाल अधिकाऱ्याकडून विचारणा करण्यात आला आहे.
पेपरफुटीसंदर्भात पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी, अशी सूचना अधिकाऱ्याकडून विद्यार्थ्याला देण्यात आली आहे. आम्ही तुमच्याकडे नाहीतर पाकीस्तानमध्ये जाऊन विचारायचं का? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आला होता. त्यानंतर तुम्ही आधीची भरती ज्या ठिकाणी पाहिली होती, त्या ठिकाणी तपासा , असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या महिला अधिकाऱ्याचा फोन नंबर आम्हांला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकांकडून मिळवला असल्याचं सांगितल्यानंतर माझा नंबर सर्व व्हॉट्सअप नंबरवर फिरत असून मला याबाबत अनेकांचे फोन येत आहेत. सर्वांचेच बोलणे सारखे असून तुम्ही मला भरती कधी आहे हे विचारण्यापेक्षा परिक्षेचा अभ्यास करा, असा सल्ला या महिला अधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे.
नूकतीच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा परिषदेच्या भरतीबाबत मोठा ताप झाल्याच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून आता आणखी एका महिला आरोग्य अधिकारी आणि आरोग्य भरतीच्या उमेदवारांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल होत आहे. त्यावरुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एकच प्रश्न पडला आहे की, अखेर भरतीची जाहिरात कधी प्रसिध्द होणार आहे? याच उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याचं दिसून येत आहे.