Old Pension Scheme : चर्चा फिस्कटली… पुन्हा नवी समिती स्थापन करणार!
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारबरोबर कर्मचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे. मात्र, राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एक समिती स्थापन करावी अशी सरकारने भूमिका घेतली आहे.
राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारबरोबर या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
याबाबत प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी सांगितले की, माझी इतर संघटनांना विनंती आहे की सर्व संघटनांनी समोपचाराची भूमिका घ्यावी. उद्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती स्थापन करत आहोत असं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. मात्र, अजूनही अहवाल आला नाही. आम्ही पाठपुरावा करण्यास कमी पडलो.
आमच्या संघटनेकडे सगळ्यात जास्त सदस्य आहेत. जर सरकार सगळ्या गोष्टी मान्य करण्यास तयार असेल तर मग आंदोलन कशाला करायचे. त्यामुळे आम्ही संपात सहभागी झालेलो नाही. त्यामुळे माघारी घ्यायचा विषयच नाही. आम्ही पाठपुरावा करायला कमी पडलो. मागचा समितीने त्यामुळे अहवाल दिला नाही. आता नवीन समिती स्थापन होतेय. त्यामुळे आम्ही यांच्या पाठीमगे लागून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजी थोरात यांनी सांगितले.