‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. (Onion issue may face difficulty for BJP and Mahayuti in seven Lok Sabha and 32 assembly constituencies)
शेतकऱ्यांच्या या नाराजीला दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, या भेटीमागे शेतकऱ्यांचे हीत असले तरी एकप्रकारचे राजकारणही असल्याचे दिसून येते. कारण या सगळ्या तापलेल्या वातावरणाचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांद्याच्या वांद्यामुळे राज्यात 7 लोकसभा आणि तब्बल 32 विधानसभा मतदारसंघांमधील सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली असल्याचे बोलले जात आहे.
कांदा करणार महायुतीचा वांदा :
महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हा कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. या पाच जिल्ह्यांमध्ये लोकसभेचे सात मतदारसंघ येतात. यात दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, माढा, सातारा, शिरुर, बारामती हे सात लोकसभेचे मतदारसंघ कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मानले जातात. यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यामुळे 42 पैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना समाना करावा लागू शकतो.
दिंडोरी –
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील निफाड तालुक्यात येणाऱ्या लासलगावला देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. दिंडोरी लोकसभा आणि 6 विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, मालेगाव, कळवण व सटाणा परिसरात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यात लासलगाव परिसर आघाडीवर आहे. इथल्या कांद्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे 2016 साली येथील कांद्याला ‘लासलगाव कांदा’ असे भौगोलिक चिन्हांकनही मिळाले आहे. त्यामुळे इथल्या कांद्याला जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे.
छत्तीसगडमध्ये आणखी एक धक्का, पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री तर रमण सिंग नव्या भूमिकेत
दिंडोरीमधून सध्या भारती पवार या भाजपच्या खासदार आहेत. तर नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे, चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत. उर्वरित चार ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आहेत. यात कळवणमधून नितीन पवार, येवलामधून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर आणि दिंडोरीमधून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत. एकूण संपूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांद्याच्या पट्ट्यात येणार असून इथे आता सर्वच जण सत्ताधारी गटात आहेत.
अहमदनगर –
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कांद्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेली डोंगर उताराची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन या सर्व भागात असल्याने कर्जत जामखेड वगळता अन्य ठिकाणी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अहमदनगरमधून सध्या भाजपचे सुजय विखे पाटील खासदार आहेत. तर शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजाळे, राहुरीमधून राष्ट्रवादी (शरद पवार गट) गटाचे प्राजक्त तनपुरे, पारनेरमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) निलेश लंके, अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप, श्रीगोंद्यामधून भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत.
शिर्डी –
अहमदनगरप्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातीलही सर्व 6 मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शिर्डीतून सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. तर सहामधील अकोलेमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) किरण लहामटे, संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आशुतोष काळे, श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे, नेवासामधून क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे (शिवसेनेचे) शंकरराव गडाख आमदार आहेत.
माढा –
माढा मतदारसंघातील करमाळा, माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये कमी प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र याच मतदारसंघातील माळशिरस, फलटण आणि माण या मतदारसंघातील गावांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावरील उत्पन्न घेतले जाते. माढ्यातून सध्या भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. तर माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते आमदार आहेत. याशिवाय फलटणमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) दीपक चव्हाण आणि माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आमदार आहेत. विशेष म्हणजे निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाख 630 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला इथून एक प्रकारे धोक्याचीच घंटा असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागले, लुटलेला पै-पै परत करावा लागले; धीरज साहू प्रकरणी जेपी नड्डांची टीका
सातारा –
माढा मतदारसंघाला लागून असलेल्या कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. याच खंडाळा तालुक्यात लोणंद ही काद्यांची महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरची बाजारपेठ आहे. खंडाळा, वाई, कोरेगाव, फलटण आणि माण या भागातून कांद्याची आवक होत असते. साधारण 15 एकरातील या बाजारपेठेत आठवड्याला साडेसात ते आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होते. कोरेगावमधून सध्या शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत, तर खंडाळा तालुका हा वाई मतदारसंघात आहे. दोन तालुक्यांच्या या मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट) मकरंद पाटील आमदार आहेत.
शिरुर –
शिरुर हा मतदारसंघ टोकाचा शहरी आणि टोकाचा ग्रामीण अशा दोन्ही भागांत विभागला गेला आहे. तिरक्या पसरलेल्या या मतदारसंघातील भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ सोडले तर अन्य चारही मतदरासंघ हे ग्रामीण पट्ट्यातील असून सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. शिरुरमधून सध्या राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. तर शिवसेनेचे अढळराव पाटील लोकसभेच्या तयारीला लागले आहेत.
विधानसभेच्या बाबत विचार करायचा झाल्यास जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदीमधून सत्ताधारी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार आहेत. यात जुन्नरमधून अतुल बेनके, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते आमदार आहेत. शिरुरमधून राष्ट्रवादीचे पण शरद पवारांच्या गटातील अशोक पवार आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कांद्याच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
बारामती –
बारामती मतदारसंघही कांदा उप्तादन करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहेत. अगदी नाराज शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केल्यास निकाल बदलू शकेल इतपत संख्या मोठी आहे. बारामतीमधून सध्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) गटाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. तर सहा विधानसभांपैकी बारामतीमधून स्वतः अजित पवार, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, इंदापूरमधून राष्ट्रवादीचे (अजित पवार) दत्तात्रय भरणे, पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे आणि खडकवासल्यातून भाजपचे भिमराव तापकीर आमदार आहेत.