विज्ञान शिकवणारा शिक्षक की अंधश्रद्धेचा प्रचारक? नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या व्हिडिओवरून संताप

विज्ञान शिकवणारा शिक्षक अंधश्रद्धेचा आधार घेत विद्यार्थ्यांची दिशाभूल करत होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 85 1

Outrage over Shivraj Motegaonkar’s video : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आणि रेणुकाई करिअर सेंटरचा संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने पुण्यातून अटक केल्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे शिक्षणक्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, विज्ञान शिकवणारा शिक्षक अंधश्रद्धेचा आधार घेत विद्यार्थ्यांची दिशाभूल करत होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर वर्गातील बाकावर उभा राहून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडताना दिसत आहे. एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हातात पाने घेऊन तो विद्यार्थ्यांवर पाणी उडवत असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर तुम्ही सर्वजण एम्समध्ये प्रवेश मिळवणार आहात, असा योग अनेक वर्षांनंतर आला आहे, असा दावा करत तो विद्यार्थ्यांना कथित ‘आशीर्वाद’ देताना दिसतो. त्यामुळे कोट्यवधींची फी घेणाऱ्या या शिक्षणसम्राटाचा अंधश्रद्धाळू चेहरा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटेगावकरने लातूरमध्ये कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक साम्राज्य उभे केले होते. नामांकित डॉक्टरांच्या मुलांसाठी तो ‘फोटॉन’ नावाची विशेष बॅच चालवत होता. या बॅचची फी विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा पाहून ठरवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. केमिस्ट्री विषयाचे उत्तम अध्यापन करणारा शिक्षक म्हणून त्याची ओळख असली, तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या घोटाळ्यात त्याचे नाव आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कोट्यवधींची जमीन, 100 कोटींचं साम्राज्य, आरोपी मोटेगावकरच्या मालमत्तेने तपास यंत्रणांनाही धक्का

दरम्यान, या प्रकरणातील तपासात मनीषा कनेक्शनचीही जोरदार चर्चा रंगली आहे. सीबीआयने पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली असून, या घोटाळ्यात अटक झालेल्या तीन महिला आरोपींचे नाव मनीषा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा निव्वळ योगायोग आहे की या नावामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचाही तपास सीबीआयकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने पुणे, नाशिक, लातूर, अहिल्यानगर, जयपूर, गुरुग्राम आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये धाडसत्र राबवले आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, हार्ड डिस्क तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. नीट घोटाळ्याचे धागेदोरे आता देशभर पसरले असल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us