conjunctivitis : महाराष्ट्रात ‘डोळे येणे’ आजाराचा उद्रेक; आळंदी ठरतोय हॉटस्पॉट

conjunctivitis : महाराष्ट्रात ‘डोळे येणे’ आजाराचा उद्रेक; आळंदी ठरतोय हॉटस्पॉट

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येणे या आजाराची लाट आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात डोळे येणे आजाराचे आतापर्यंत 39 हजार 426 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अद्याप या आजाराचा उद्रेक झाला नसला तरीही महापालिकेनेही सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Over 39,000 cases of conjunctivitis reported in Maharashtra)

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार हा आजार अॅडिनो आणि इंटेरो व्हायरसमुळे होतं आहे. या आजाराने सर्वात जास्त लक्ष पुणे जिल्ह्याला केले आहे. पुण्यात आतापर्यंत 7871 रुग्ण आढळून आले आहेत. तर आळंदी हे डोळे येणे या आजाराचे हॉटस्पॉट ठरले आहे.

गत आठवड्याच्या सुरुवातीला आळंदी आणि खेड तालुक्यातील दोन सीमावर्ती गावांमधून जिल्हा प्रशासनाला 2500 हून अधिक रुग्ण आढळून आले होते. तर आठवडा संपेपर्यंत आणखी 2000 नवीन रुग्णांची भर पडली. पाऊस आणि इतर हवामानामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचाही अंदाज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. याशिवाय पुण्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 6693 रुग्ण आढळून आले आहेत.

डोळे आल्यास अशी ‘घ्या’ काळजी :

जर तुम्हाला डोळे आले असतील तर दिवसातून दोन वेळा डोळे पाण्याने स्वच्छ करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध किंवा इलाज करू नका. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात. डोळे बरे होण्याऐवजी दुसऱ्या समस्या निर्माण झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी दिलेले ड्रॉप वेळच्यावेळी टाका.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी या आजाराचा फैलाव जास्त झाला आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. एकामुळे संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होऊ शकतो. हा आजार बरा होण्यास 3-5 दिवस लागतात. एका नंतर दुसऱ्या डोळ्यालाही होऊ शकते. त्यामुळे हा आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा हा आजार होऊ नये यासाठी अगोदर काळजी घेणे गरजेचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube